महूद येथील रौनक शेख याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

महूद, ता. १६ : महूद सारख्या ग्रामीण भागात चिकन सेंटर चालवून कुटुंबाची उपजीविका करणाऱ्या ईरशाद शेख यांचा मुलगा रौनक शेख याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत राज्यात खुल्या प्रवर्गातून ५५ वी रॅंक घेऊन निवड झाली आहे. रमजान ईदच्या आदल्या दिवशी हा निकाल आल्याने या कुटुंबाची ईद अधिकच गोड झाली.
ईरशाद शेख हे मूळचे सोलापूर येथील. आसरा जवळील लोकमान्य नगरामध्ये राहत होते.तेथे असलेल्या मुन्शी विडी कंपनीत लिपिक म्हणून काम करून कुटुंब चालवत होते. मात्र एका अपघातामध्ये त्यांना सोलापूर सोडावे लागले.मुले लहान असतानाच ते महूद येथे राहावयास आले.महूद सारख्या ग्रामीण भागात दुकानाची जागा व राहते घर भाड्याने घेऊन राहू लागले. केवळ चिकन सेंटर चालवून त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले.
रौनक शेख याचे प्राथमिक शिक्षण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण येथील शिवाजी विद्यालयात झाले.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घेतलेल्या रौनक ने अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयातून ॲग्रीची पदवी घेतली. सन २०१६ नंतर त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी पुणे येथे अभ्यास सुरू केला.अनेक वेळा परीक्षा देऊनही यश हुलकावणी देत होते. मात्र यामुळे कधीही न खचता रौनकने आपला अभ्यास सुरू ठेवला.पोलीस उपनिरीक्षक पदाच्या दिलेल्या मुख्य परीक्षेमधून त्याचा अनुभव व चिकाटी वाढत गेली.अखेर २०२१ च्या परीक्षेचा निकाल नुकताच आला.या परीक्षेत रौनकची ५५ व्या रँकने खुल्या प्रवर्गातून निवड झाली आहे.सातत्याने यश हुलकावणी देत होते,मात्र परीक्षेमध्ये होणाऱ्या आपल्या चुका लक्षात आल्या.त्या चुका दुरुस्त करून आपण पुढे जायचे ठरविले. आत्मविश्वास वाढत गेला त्यामुळेच आपण या यशाला गवसणी घालू शकलो असे रौनक शेख सांगतो.
केवळ चिकन सेंटरवर कुटुंब चालविणाऱ्या ईरशाद शेख यांनी फक्त मुलालाच शिकण्यासाठी प्रेरणा दिली असे नाही तर मुलीलाही उच्चशिक्षित केले आहे.त्यांची मुलगी रहिमा डीएड,एम.ए.बी.एड्. झाली असून एका खाजगी शाळेत शिक्षिकेची नोकरी करत आहे.
१) कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक आहे, याची जाणीव असल्याने मी कधीही अडचणी सांगून घरच्यांना त्रास दिला नाही.अभ्यास सुरू असताना मित्रांची खूप मदत झाली. माझी आर्थिक स्थिती माहित असल्याने मेस चालकाने एका वेळच्या जेवणाच्या पैशात मला दोन वेळचे जेवण दिले. एकाच वेळी लाखो विद्यार्थी तयारी करून परीक्षेला उतरतात. त्यामुळे आपल्याला लवकर यश मिळेल असे नाही.त्यासाठी संयम व सातत्य हवे आहे.-रौनक शेख
२) खाकी वर्दीची प्रचंड आवड असलेल्या रौनकला अभियांत्रिकी शाखेला प्रवेश मिळाला होता. मात्र त्याची आवड पाहून आम्ही त्याला तेच शिक्षण घेण्यास सांगितले.अखेर कठोर परिश्रम,जिद्द,चिकाटी याच्या जोरावर त्याने यश मिळवले.आम्ही त्याला भक्कम आधार दिला.- ईरशाद शेख