पन्नास वर्षानी पुन्हा एकदा भरली शाळा; विद्यामंदिरच्या 1974 च्या विद्यार्थ्याचा स्नेहमेळा संपन्न

सांगोला(प्रतिसनिधी):- सध्या वृत्तपत्र उघडले की विविध ठिकाणी होत असलेल्या गेट टुगेदर च्या बातम्या वाचनात येतात.वीस वर्षानी, पंचवीस वर्षानी शाळेतील मित्र एकत्र येतात,कार्यक्रम घेतात,जुन्या आठवणीना उजाळा देतात,गुरुजनाविषयी कृतज्ञता व्यक्त करतात, हे वाचले की मन भरुन येते.असाच एक 67- 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळा नुकताच सांगोला येथील हॉटेल जयनिला या ठिकाणी संपन्न झाला.
सांगोला विद्यांमदिर प्रशालेतुन जे विद्यार्थी 1974 साली एस एस सी उत्तीर्ण झाले, त्या विद्यार्थ्यांनी शाळा सोडून बाहेर पडल्यानंतर 50 वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र भेटूया अशी कल्पना मांडली, आणि ती कल्पना तेव्हाचे विद्यार्थी व आज समाज जीवनात मान्यवर असणार्या ज्येष्ठ नागरिकांनी प्रत्यक्ष साकारली. यासाठी या बॅचचे पुणे विद्यापीठातील सेवानिवृत्त मराठी विभाग प्रमुख डॉ.अविनाश सांगोलेकर, शिवाजी पॉलीटेक्निक कॉलेजचे विश्वस्त महादेव गायकवाड, डॉ.हणमंत गावडे, सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष महिमकर, मधुकर केदार, वनमाला डोंबे मॅडम यानी पुढाकार घेवुन मित्र मैत्रिणी यांच्याशी संपर्क साधला व सदर सोहळा घडवून आणला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वर्गमित्र असलेले व मुंबई येथून पोलिस आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झालेले सिद्धेश्वर हजारे यांना देण्यात आले होते. प्रारंभी दिवंगत मित्र-मैत्रीणीना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ अविनाश सांगोलेकर यानी प्रास्ताविकात स्नेहमेळावा घेण्यामागील ऊद्देश सांगून भविष्यात दर वर्षी 1 जून रोजी स्नेहमेळावा घेण्याचे जाहीर केले.
या कार्यक्रमात सेवानिवृत्तीनंतर उल्लेखनीय कार्य केलेल्या मित्राचा व परिवारातील सदस्यांचा सन्मान करण्यात आला.या मध्ये सोलापुर जि प माजी अध्यक्ष जयमाला गायकवाड यांना नुकताच जिजाऊ पुरस्कार मिळाल्याबद्द्ल, डॉ.संध्या गावडे याना ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन शाखा सांगोला अध्यक्षा म्हणून निवड, मनिषा ठोंबरे यांची केसरी यू ट्यूब आयोजित महाराष्ट्राचा महाकवी या स्पर्धेत अंतिम फेरीत सहभाग घेतल्याबद्दल अभिनंदनपत्र व स्नेह वस्त्र देवून सन्मान करण्यात आला.त्याच प्रमाणे अविनाश 65 या पुस्तकास नऊ पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.अविनाश सांगोलेकर, स्टार ऑफ द गेट टुगेदर पुरस्कारप्राप्त प्रा.राजाभाऊ ठोंबरे व जीवन गौरव पुरस्कार मिळाला म्हणून अरूण काळे यांचा सन्मान करण्यात आला.
स्वयंपरिचय कार्यक्रमात प्रत्येक सदस्यांनी आपली ओळख करुन दिली. पुरस्कार प्राप्त व्यक्ती पैकी मनिषा ठोंबरे यांनी काव्यवाचन, डॉ संध्या गावडे यानी आरोग्यविषयी मार्गदर्शन, डॉ.अविनाश यांची विनोदी गझल व अरूण काळे यांच्या अनुभव कथनाने कार्यक्रमाची रंगत वाढली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना हजारे यांनी पोलिस खात्यामधील आव्हानात्मक गोष्टी सांगून ते करत असलेल्या सामजिक कार्याची ओळख करून दिली. शेवटी पुढील वर्षी 1 जून 2025 रोजी होणार्या गेट टुगेदरच्या अध्यक्षा म्हणून वनमाला डोंबे यांची निवड केल्याची उद्घोषणा करण्यात आली. सुत्रसंचालन भिमाशंकर पैलवान तर आभार प्रदर्शन इंजि.महादेव गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.पंजाबराव चव्हाण, मधुकर केदार, मल्लिकर्जुन अरबळी, सुभाष महिमकर यानी परिश्रम घेतले.