‘यशाचं शिखर पार करताना शालेय स्पर्धा परीक्षा ही पहिली पायरी’- शिक्षणाधिकारी सचिन जगताप*
*सांगोला विद्यामंदिरमध्ये एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीपात्र 126 विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न*

सांगोला (वार्ताहर)- जीवनात शाश्वत आणि निरंतर फक्त ज्ञानच असून आयुष्य यशस्वी करण्यासाठी गणित व विज्ञानाच्या अभ्यासासोबत कला, संगीत, वाचन तसेच मूल्यशिक्षण व संस्कारही तितकेच आवश्यक असल्याचे उद्गार सचिन जगताप सो. (शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, जि.प.सोलापूर) यांनी काढले. सां.ता.शि.प्र.मंडळ आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस) परीक्षा 2023-24मध्ये शिष्यवृत्तीपात्र व छ.राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांच्या सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, प्राचार्य गंगाधर घोंगडे, अमोल गायकवाड, श्रीकांत लांडगे उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करताना कोरोना काळात शिक्षणासाठी मोबाईल उपयुक्त ठरला असला तरी तो शिक्षक,शाळा व पुस्तक यांच्यासारखा प्रभावी नसून प्रत्येकाच्या जीवनात शाळेचे व शिक्षकांचे स्थान अविस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले. सर्जनशीलता व प्रयत्नातील सातत्यातूनच एप्पल संस्थापक स्टीव्ह जॉब्स व ॲलन मस्क हे जगविख्यात बनले तर थोरस्वातंत्र्यसेनानी बापूसाहेब झपके, महात्मा गांधी, विनोबा भावे, भारताचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्या उदाहरणातून प्रचंड आत्मविश्वास, सन्मार्ग व स्वावलंबन यातून जीवन संस्कारमय होते हे त्यांनी स्पष्ट केले.
आत्मविश्वास, चांगल्या सवयी व प्रयत्नांचे सातत्य अंगी असेल तर आपण जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो असे सांगत प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आजच्या या यशामध्ये विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे वर्षभराचे कष्ट आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे सांगत विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य कै.चंद्रशेखर विश्वनाथ तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार समर्पित करण्यात आला.
प्रास्ताविकातून प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी संस्थेतून विविध स्पर्धा परीक्षांमधून दरवर्षी शेकडो विद्यार्थी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत येत असून यासाठी शिक्षकांच्या अविरत परिश्रमाबरोबर संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांची प्रेरणा व संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब यांचे मार्गदर्शन मौल्यवान असल्याचे सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांबरोबरच सर्व शाखांमधील मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, नियंत्रक पर्यवेक्षक, लिपीक, प्रशाला बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख व संस्था बाह्यपरीक्षा विभाग प्रमुखांचाही सत्कार करण्यात आला.
शाळा व शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनातूनच आमचे यश असल्याचे प्रांजळ मत यावेळी प्रतीक्षा जानकर हिने विद्यार्थी मनोगतातून तर विद्यामंदिर पॅटर्न हा भविष्यवेधी असून लातूर पॅटर्न पेक्षाही यशस्वी ठरेल असा आत्मविश्वास दत्तात्रय वाघमारे यांनी पालक मनोगतातून व्यक्त केला.
यावेळी उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्या शाहिदा सय्यद, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, अजय बारबोले, पोपट केदार, रफिक मणेरी, मुख्याध्यापक उदय बोत्रे, सरिता लिगाडे, रोहिणी व्हटे, यांच्यासह सांगोला, नाझरा व कोळा विद्यामंदिर प्रशाला तसेच सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय व सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल येथील शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशाला बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख वैभव कोठावळे यांनी तर आभार संस्था बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख नामदेव खंडागळे यांनी मानले.
कार्यक्रमानंतर सर्वांसाठी अल्पोपहार व चहापानाची सोय करण्यात आली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाह्यपरीक्षा विभाग व उत्सव विभाग यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कष्ट घेतले.
*कै.बापूसाहेब झपके यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होण्यासाठी सुरू केलेल्या शिक्षणसंस्थेत विद्यार्थ्यांची आजच्या घडीची शैक्षणिक वाटचाल सुकर करण्यासाठी संस्था व सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत. यादृष्टीने संस्थेच्या विविध शाखांमध्ये आज मराठी माध्यम, सेमीइंग्रजी माध्यम व इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध असून विद्यार्थ्यांना नीट, जे.ई.ई. व एम.एच.सी.ई.टी. यासारख्या परीक्षांसाठी इ.नववी पासूनच फाउंडेशन कोर्स देण्यात येणार असल्याचा मानस संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी व्यक्त केला.*