सांगोला तालुका

तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी विरोधकांच्या तुतारीची फुकारी करतील ; आमदार शहाजीबापूंची मोहिते पाटलांवर सडकून टीका

 

सांगोला (प्रतिनिधी): रामायण, महाभारत संपेल पण मोहिते पाटील आणि शहाजीबापूंचा इतिहास संपणार नाही. मोहिते पाटलांनी ५० वर्षे सांगोला तालुक्याचं नीरा उजवा कालव्याचं पाणी अडवलं. गेल्या पाच वर्षात टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा या सिंचन योजनेचे पाणी आले आहे. ऐन उन्हाळ्यात कोयना धरणातून पहिल्यांदा माण नदीत सोडले आहे. ५५ वर्षे भोगलेल्या दुष्काळाच्या झळा काळजात असतील तर या तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी विरोधकांच्या तुतारीची फुकारी केल्याशिवाय राहणार नाहीत अशी सडकून टीका आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली.

माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ बुधवार २४ एप्रिल रोजी सांगोला तालुक्यात खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभा पार पडली.

पुढे बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, पवारांना, विजयदादांना निवडून दिलं, पण काय काम केले ते दिसले नाही. नीरा उजवा कालवा सिंचन योजनेतून एक टीएमसी पाणी वाढवून दिले आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील नुकसानीचे अनुदान प्रत्येक शेतकऱ्याला मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मोहिते पाटील पाण्यासाठी सांगोल्याला पैसे देणार नाहीत, तुतारी घात करील. ज्यांनी ५० वर्षे सांगोल्याला पाणी मिळू दिले नाही तेच मोहिते पाटील निवडणुकीत मते मागत आहेत. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी साथ दिली आहे. उजनीचं पाणी पळवून नेलं तर रक्तरंजीत क्रांती केली जाईल असा इशारा दिला होता म्हणून उजनीचं दोन टीएमसी पाणी तालुक्याला मिळणार असल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.

यावेळी बोलताना भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, पवार साहेब राजकारणातले जाणते नेते असतानाही त्यांनी या मातीत निवडून आल्यानंतर इथल्या योजना, पाणी, रस्ते, योजना, रोजगार बारामतीला गेला, म्हणून शरद पवारांच्या भूमिकेचा तिटकारा आला. पवारांशी ताकदीने वाद घालून, त्यांच्याशी लढून पाणी आणावं लागलं. ज्या वेळेस इस्टेटीची वाटणी होते, त्यावेळी एकाच पोराला सगळी इस्टेट दिली तर त्याला शहाणा बाप कोण म्हणेल का ?. तसंच बारामतीच्या पवारांना शहाणा बाप कसा म्हणायचं अशा तीव्र शब्दात खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पवारांवर निशाणा साधला. पवारांनी मावळत्या सूर्याची शपथ घेवून सांगोला तालुक्याला दुष्काळमुक्त करण्याचा शब्द दिला होता. सूर्य देखील मावळला आणि पवार साहेब देखील मावळले पण सांगोल्याचा प्रश्न सुटला नाही. पवारांनी पाण्याचा प्रश्न सोडविण्याऐवजी माढा मतदारसंघाचे हक्काचे पाणी बारामतीला पळवून नेले. मोहिते पाटील यांनी पतसंस्था, बँका, साखर कारखाने बुडवले, घोटाळे केल्याचा आरोप खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी केला.

 

यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, राजश्री नागणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, भाजप तालुकाध्यक्ष अतुल पवार, दुर्योधन हिप्परकर, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत चव्हाण, उत्तम खांडेकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष विनोद बाबर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

चौकट
खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी रस्ते, पाण्यांसह विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. सांगोल्याला पाण्यासाठी ५० वर्षे संघर्ष करावा लागला. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पाण्याचा प्रश्न सोडवून न्याय दिला. सांगोला तालुक्याच्या विकासासाठी आमदार शहाजीबापूंनी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. – दीपकआबा साळुंखे पाटील, माजी आमदार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!