राजकीयमहाराष्ट्रसांगोला तालुका

पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकारणात ३२ वर्षे संघर्ष केला – आमदार शहाजीबापू पाटील

 

सांगोला ( प्रतिनिधी): १९९३ पासून पाण्याचा लढा सुरू असून राजकारणातील ३२ वर्षे पाण्यासाठी संघर्ष केला आहे. शेतीला पाणी असेल तर जीवन समृध्द होते. सांगोला तालुक्यात तीव्र दुष्काळ पडल्याने माण नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. खासदारांनी दौरा अर्धवट सोडून फडणवीसांच्या भेटीला गेले आणि थेट कोयना धरणातील पाणी टेंभू योजनेतून माण नदीत सोडले. ऐन उन्हाळ्यात कृष्णा-कोयनेचे पाणी तालुक्याला मिळाल्याने माणसांची, जनावरांची तहान भागली. नीरा उजवा कालव्याच्या पाण्यासाठी मोहिते पाटलांनी कधीही सहकार्य केले नाही. तालुक्याचा दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी आणि सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मतदारांनी सहकार्य करावे आणि महायुतीचे उमेदवार खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले

माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार. शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यात गावभेट दौरा संपन्न झाला. पारे, नराळे, मानेगांव, डिकसळ, हणमंतगांव, हंगीरगे, निजामपूर, कडलास, वासुद, वाणीचिंचाळे, लोणविरे या गावात गावभेट दौरा करून मतदारांशी संवाद साधला. यावेळी संग्रामसिंह जाधवराव, भाऊसाहेब रूपनर, दुर्योधन हिप्परकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार दीपकआवा साळुंखे पाटील म्हणाले, आम्ही कष्टाने आणलेल्या पाण्याचे श्रेय घेण्याचे विरोधकांचे काम सुरू आहे. आतापर्यंत निवडून आलेल्या खासदारांनी फक्त सभामंडप देवून त्यावरच राजकारण केलं आहे. मात्र खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. सिंचनासाठी पाणी नसल्याने गेली ५० वर्षे लोकांना प्रपंच चालवण्यासाठी ऊसतोडीचे काम करण्यासाठी गाव सोडावे लागले. मात्र, शहाजीबापूंनी आमदार झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सोडवला आणि खऱ्या अर्थाने तालुक्यात हरितक्रांतीला सुरुवात झाली. आता आपल्याला हक्काचे पाणी मिळत असल्याने पाणी आणणाऱ्याला खासदार म्हणून निवडून द्यायचे आहे. उजनीच्या दोन टीएमसी पाणी योजनेचे दोनदा भूमिपूजन झाले, मात्र काम सुरू झाले नाही. त्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार शहाजीबापू पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केल्याने सुमारे ९०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. गेल्या ५५ वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी गेल्या पाच वर्षात खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यासाठी आणला असल्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!