कोळा जुनोनी परिसरात बेरोजगारीत जखडली युवा पिढी

सांगोला तालुक्यातील पश्चिम भागातील कोळा,जुनोनी डोंगर पाचेगाव किडबिसरी कोळे कराडवाडी कोंबडवाडी तिप्पेहळी गौडवाडी जुनोनी जुजारपुर हटकर चोपडी नाझरा मंगेवाडी हातीद गौडवाडी ग्रामीण भाग व परिसरात खेडोपाडी तरुण नेतेमंडळीच्या झगमगाटाच्या मोहात अडकत असल्याचे पाहावयास मिळत आहे. अनेकांच्या हातांना कामे नाहीत. त्यामुळे कमी कष्टात व कमी कालावधीत पैसे मिळविण्याचे मार्ग चोखाळताना अनेक अडचणींना सामोरे जाताना ते व्यसनांचा आधार घेत आहेत.
दिवसभर जुगार खेळण्याकडे युवक आकर्षित होत आहेत. तर सायंकाळी पारांवर किंवा चौकाचौकांत बसून राजकारणाच्या गप्पा मोठ्या दिमाखात सुरू असतात. नेतेमंडळीचा प्रभाव तरुणांवर स्पष्ट जाणवत आहे. माझ्या नेत्यासाठी कायपण, अशा जोषात हे युवक वावरत असतात. आपल्या नेत्याविषयी वाईट-साईट ऐकून घ्यायला ही तरुणाई तयार नाही. राजकारण आणि क्रिकेटशिवाय स्वतःचा, गावाचा, तालुक्याचा विकास त्यांच्या ध्यानीमनीही नसतो. तरुणाई याव्यतिरिक्त सोशल मीडियावर देखील अधिक वेळ घालवत आहे. चिकन, मटणाची पार्टी आणि झिंगाट होण्यात बराचसा वेळ खर्च करत आसल्याचे वास्तव चित्र सर्वत्र खेडोपाडी असल्याचे नाकारून चालणार नाही. काम करणारे तरुणदेखील दिवसभर काबाडकष्ट करून सायंकाळी तीच कमाई दारूत बुडवत आहे. घरी त्यांच्या पैशांचा हातभार लागत नसल्याने घरोघरी वादविवाद नित्याचे झाले आहेत. वाढदिवस साजरा करण्याचे फॅड तरुणाईला आकर्षित करत असून ग्रुपमधल्या युवकांचा वाढदिवस चाकूने करण्याचा नवा फंडा सगळ्या प्रत्येक गावात सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे. वाढदिवस कुठेही सार्वजनिक ठिकाणी करण्याचे, मोठमोठे चौकात फलक लावणे, कर्णकर्कश आवाज करत गाड्या हाकणे, धिंगाणा घालणे, गर्दी दाखवणे अशा नौटंकीत युवा पिढी गुंतली आहे. आयुष्यात कोणतेच ध्येय नसलेली, केवळ चैन करणे आणि मजेत जगणे, अशीच स्वप्ने युवक पाहत आहेत. घडीभराचा खेळ सारा हे माहीत असताना देखील आजचा युवक याकडेच आकर्षित होत आहे. समाजातील वडीलधारी मंडळींनी या तरुणाईला वेळीच लगाम घालणे काळाची गरज बनले आहे. यांना वठणीवर आणणार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. वीस ते तीस टक्के युवक स्वतःच्या करिअरविषयी गंभीर आहेत, तर सत्तर टक्के युवक याबाबत अजिबात गंभीर नसल्याचे विदारक कोळा जुनोनी परिसरात चित्र समाजात पाहायला मिळत आहे. आज समाजात चांगल्यापेक्षा वाईट गोष्टीची चर्चा फार होते, दरारा राहतो, नम्र राहणाऱ्या पळपुटेपणा समजले जाते, म्हणून बरेच युवक वाईट करण्यासाठीच जास्त वेळ देतात व ऊर्जा खर्च करतात. त्यामुळे उद्याचे देशाचे भविष्य अंधारमय आहे; पण हे या युवकांना सांगणार तरी कोण? वा स्वतःच शहाणपण केव्हा येणार, हा प्रश्न समाजात आ वासून उभा राहिला आहे…
कोळा जुनोनी परिसरात अल्पवयात तरुण पिढी व्यसनधिनकडे वळाली असल्याचे दिसून येत आहे सिगरेट दारू दिवसभर पत्या खेळत आहे त्यांचं भविष्य अंधारमय होत असल्याचे दिसून येत आहे पालक वर्गानी या गोष्टीकडे लक्ष देऊन वेळीच आपल्या मुलावर आवर घातला पाहिजे असे वाटते..
~ शिवाजी चौगुले
सामाजिक कार्यकर्ता जुनोनी