चोपडी मध्ये पठाण साहेब दर्गा उरुसाचे आयोजन
नाझरा(वार्ताहर):- सांगोला तालुक्यातील चोपडी गावांमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पठाण साहेब दर्गा उरुसाचे आयोजन करण्यात आले आहे. चोपडी येथील कोळा रोड वरती असणाऱ्या सिद्धनाथ नगर परिसरात पठाण साहेब दर्गा असून गेली 16 वर्ष हा उरूस मोठ्या भक्ती भावाने हिंदू लोक साजरा करीत आहेत.
गुरुवार दिनांक 16 मे 2024 रोजी देवाची आंघोळ घालून पहाटे पाच वाजता या उरुसाची सुरुवात होत आहे देवाला पोशाख परिधान केला जाणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता संदल चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी रात्री नऊ ते बारा श्री दत्त सोंगी भजनी मंडळ दहिवडी यांचा भारुडाची जुगलबंदी हा अतिशय बहारदार असा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
शुक्रवार दिनांक 17 मे 2024 रोजी सकाळी आठ वाजता देवाची आंघोळ व पोशाख तर सायंकाळी पाच वाजता जंगी कुस्त्यांचे मैदान भरवण्यात येणार असून त्यानंतर आलेल्या सर्व भाविकांसाठी पठाण साहेब बाबा दर्गा उरूस यात्रा कमिटीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद भाविक भक्तांनी घेण्याचे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.