प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारपासून रक्तदान शिबिरास सुरुवात ; मानवतेच्या कल्याणासाठी सलग २१ वर्ष आयोजन

सांगोला (प्रतिनिधी) सांगोले नगरीचे माजी नगराध्यक्ष,महाराष्ट्र विरशैव सभा प्रांतिक अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी प्रांतिक सदस्य, आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना प्रांत ३२३४ ड१चे माजी प्रांतपाल, सां.ता.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष व विद्यामंदिर परिवार,लायन्स क्लब,महाराष्ट्र साहित्य परिषद, नगर वाचन मंदिर सांगोला शाखांचे मार्गदर्शक मा.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या आचार-विचारा पाठीमागील सेवाभाव प्रमाण मानून गेली २१ वर्षे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यामंदिर परिवार व लायन्स क्लब ऑफ सांगोला आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १००० पेक्षा जास्त रक्तदाते रक्तदान करतात.
एप्रिल महिना सुरु झाला की, जवळपास सर्वच रक्तपेढ्यांना रक्ताची चणचण भासते. परीक्षेचा कालावधी, सुटीच्या काळात वाढलेली नियोजीत सर्जरींची संख्या आणि उन्हाळ्यामुळे वाढत असलेले आजार या सर्वंच बाबींचा परिणाम रक्त साठा कमी होण्यावर होतो. अशा पार्श्वभूमीवर दूर्घटना घडल्यास संबंधितांना रक्त मिळणेही जिकरीचे ठरते. तसेच अपघात, ऑपरेशन्स, बाळंतपण, ऍनिमिया, डायलिसिस, थॅलसेमिया आदिंमुळे रक्ताची गरज असलेल्या पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.त्याचबरोबर संसर्गजन्य आजारासाठीसुद्धा रक्ताच्या प्लेट्स वापराव्या लागतात. रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होण्याची तर सध्या जणू ‘साथ’च आली आहे. शिवाय दररोज होणारे अपघात यामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताची निकड भासते. परंतु रक्तपेढ्यांमध्येच रक्तसाठा पुरेसा नसल्यामुळे संबंधितांना रक्तासाठी ऐनवेळी धावपळ करावी लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
म्हणून उन्हाळ्याच्या काळात रक्ताचं नातं जोडणाऱ्या रक्तदात्यांची संख्या वाढणं आम्हाला महत्त्वपूर्ण वाटते.त्यामुळे ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान’ समजून दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि.२० मे २०२४ रोजी नंदिकेश्वर ज्वेलर्स, शिवकृपा बिल्डिंग तळमजला, कोळे,मंगळवार दि.२१ मे २०२४ रोजी नाझरा विद्यामंदिर प्रशाला, नाझरा,बुधवार दि.२२ मे २०२४ रोजी लोणविरे हायस्कूल,लोणविरे,गुरुवार दि.२३ मे २०२४ रोजी जि.प.प्रा. मुलींची शाळा नं. १, जुने कोर्ट जवळ सांगोला येथे सकाळी ८.०० ते सायं. ६.०० या वेळेत संपन्न होणाऱ्या रक्तदान शिबिरामध्ये सांगोला शहर व तालुक्यातील सर्व शैक्षणिक, साहित्यिक, राजकीय, सामाजिक, औद्योगिक, कला, क्रीडा व सेवाभावी संस्था आदींसह नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे व मानवतेच्या कल्याणकारी कार्यास हातभार लावावा असे आवाहन विद्यामंदिर परिवार व सागोला लायन्स क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.