चोरून आणलेल्या म्हशी व त्यांची चोरी करणारे चोरटे यांना पकडण्यात पोलिसांना यश

महूद, ता.२६ : सांगोला पोलिसांच्या तत्परतेमुळे सातारा व सांगली जिल्ह्यातून चोरून आणलेल्या म्हशी व त्यांची चोरी करणारे चोरटे यांना पकडण्यात यश आले आहे.हे चोर आज रविवारी सांगोला बाजारात चोरलेल्या म्हशी विक्रीसाठी घेऊन आले होते.

सातारा जिल्ह्यातील कलेढोण(ता. खटाव) येथील नितीन बाळू सकट या शेतकऱ्याची म्हैस राहत्या घराजवळून चोरीस गेली होती. याबाबत नितीन सकट यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. तर सांगली जिल्ह्यातील घरनिकी ता आटपाडी येथील शामराव मेटकरी या शेतकऱ्याची ही म्हैस चोरीला गेली होती. या दोन्ही ठिकाणच्या चोरलेला म्हशी विकण्यासाठी चोरटे आज रविवारी सांगोला बाजारात आले होते. त्यावेळी पेट्रोलिंग करणाऱ्या सांगोला पोलिसांना संबंधितांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्यांना याबाबत उत्तरे देता आली नाहीत. म्हणून सांगोला पोलिसांनी या दोन म्हशी विक्रीसाठी आलेल्या चौघांना टमटम सह ताब्यात घेतले. आणि चौकशी केली असता या चौघांनी म्हशी कलेढोण व घरनिकी येथून चोरल्या असल्याचे मान्य केले.

सांगोला पोलिसांनी अमर जाधव, युवराज बुधावले,अक्षय बुधावले,अर्जुन मंडले सर्वजण राहणार करगणी(ता. आटपाडी)या चौघांसह टमटम व चोरून आणलेल्या दोन म्हशी ताब्यात घेतल्या. याबाबत खटाव(जि.सातारा)पोलिसांना याची कल्पना देऊन त्यांना बोलावून घेण्यात आले. सर्व मुद्देमालासह चौघा संशयित आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप,पोलीस उपनिरीक्षक पोपट काशीद,बापूसाहेब झोळ,लक्ष्मण वाघमोडे,असलम काझी, श्री.देवकर,वा.कि.टोळ यांनी ही कारवाई केली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button