शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

महूद (ता. सांगोला) येथील छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्यु. कॉलेज च्या 1996-97 सालच्या दहावीच्या बॅचच्यावतीने गेट-टुगेदर पंढरपूर तालुक्यातील चिंचणी कृषी पर्यटन केंद्रात मोठ्या उत्साजात साजरा करण्यात आला. यावेळी उद्योगपती सचिन गांधी यांनी तत्कालीन शिक्षक व माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचे कोल्हापुरी फेटे घालून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत झाले. श्यामसुंदर काकडे यांनी या स्नेह मेळाव्याबद्दल माहिती देत शाळेतील शिक्षकांचा व मित्रांचा आयुष्यात कसा फायदा झाला याविषयी मनोगत व्यक्त केले. सर्वांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देत आतापर्यंतचा आपापला प्रवास उलगडून दाखविला. त्यानंतर सर्वांनी आपापले अनुभव कथन केले. यापुढेही सातत्याने भेटीगाठी घेत रहायच्या असे ठरविण्यात आले. आपल्या जुन्या सहकार्यांना तथा आपल्याला ज्यांनी घडवले व जीवनात यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला. त्यांचा कृतज्ञता दिन साजरा करण्याचा मानस सचिन गांधी, डॉ. वर्षा थोरात, शुभांगी भालेकर, रवि येडगे, पो. कॉ. सोहेल पठाण यांनी बोलून दाखवला.राजू धनवडे, अरूण कोळी, फिरोज हवालदार यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. या कार्यक्रमास माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश धनवडे, बापू पवार, देविदास गोपणे यांनी परिश्रम घेतले.