sangolamaharashtrapolitical

*सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी सोलापूर शहरातील रामवाडी येथील शासकीय गोदामात मतमोजणी 4 जून रोजी होणार

सोलापूर-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 42- सोलापूर(अ. जा.) व 43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली होती. त्याच अनुषंगाने आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिनांक 04 जून 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. मतमोजणी हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असल्याने यासाठी नियुक्त सर्व नोडल अधिकारी व मतमोजणी अधिकारी-कर्मचारी यांनी ही प्रक्रिया अत्यंत दक्षता घेऊन यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

 

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, मतमोजणी हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. ज्याप्रमाणे मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली त्याप्रमाणेच सर्व नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतमोजणीची ही प्रक्रिया अत्यंत दक्षता घेऊन पार पाडावी. मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतमोजणी कक्षात प्रवेश करण्यासाठी पासेस बनवून घ्यावेत. विना पास कोणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही याची दक्षता घ्यावी. भारत निवडणूक आयोगाकडील अधिकृत पासेस असलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना माध्यम कक्षा पर्यंत प्रवेश दिला जाणार आहे. तसेच माध्यम कक्षा पर्यंत मोबाईल घेऊन जाणे व वापरणे यासाठी परवानगी असेल असेही त्यांनी सांगितले.

मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा. मतमोजणीचे पर्यवेक्षण व नियंत्रण टीम, भोजन व्यवस्था, मतमोजणी कक्ष व परिसरातील स्वच्छता, मतमोजणी अधिकारी कर्मचाऱ्यांना जागेवर जेवण्याची व्यवस्था यासाठी नियुक्ती केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.

प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांनी चार जून रोगीच्या मतमोजणीच्या अनुषंगाने रामवाडी येथील शासकीय गोडाऊनमध्ये निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. तसेच मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या सर्व नोडल अधिकारी व अन्य अधिकारी कर्मचारी यांच्यावर सोपवण्यात आलेला जबाबदारीची माहिती सविस्तरपणे सांगून ती जबाबदारी सर्व संबंधितांनी यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन केले. मतमोजणी कक्षात दोन्ही मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व प्रत्येक मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले प्रत्येकी दोन असे एकूण चार निवडणूक निरीक्षक यांनाच मोबाईल वापरण्याची परवानगी असणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!