कार व दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवकांचा दुदैर्वी अंत

सांगोला(प्रतिनिधी):-अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील कार हयगयीने अविचाराने भरधाव वेगाने चालवुन दुचाकीला जोराची धडक दिल्याने भीषण अपघातात कर्नाटक राज्यातील तीन तरुणांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला असल्याची घटना रविवारी रात्री 8.15 वाजणेच्या सुमारास सांगोला- पंढरपूर रोडवरील बामणी गावाजवळ घडली.
अपघातामध्ये महाळाप्पा धनगर रा.पट्टनकुडी ता .चिकोडी जि.बेळगाव, विठ्ठल दिवटे रा.गायकवाडी ता.निपाणी व बिराप्पा कोळेकर रा. कोगनुळी ता.निपाणी अशी मृत तरुणांची नावे आहेत .याबाबत बिरु धनगर रा पट्टणकुडी ता चिकोडी जि बेळगाव यांनी कार चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे.
अपघाताबाबत अधिक माहिती अशी की,महाळाप्पा धनगर, विठ्ठल दिवटे, बिराप्पा कोळेकर हे तिघेजण तनाळी ता. पंढरपुर येथुन शिरढोण येथे देवाला मोटारसायकलवरुन निघाले होते. पंढरपुर ते सांगोला जाणारे रोडवर मांजरी गावचेपुढे मौजे बामणी येथे ओढ्याजवळ आले असता सांगोल्याकडुन येणार्या कारच्या अज्ञात चालकाने मोटार सायकलीस समोरुन जोराची धडक दिल्याने मोटार सायकलवरील तिघांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.अपघातानंतर चालक कार जागीच लावुन पळुन गेला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. कारचे अज्ञात चालकाविरूध्द तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोसई पुजारी करीत आहेत.