नलवडेवाडी (पाचेगांव खुर्द) रस्त्यावर झाला जीवघेणा आपघात; संबंधित विभाग बळी जाण्याची वाट बघतंय काय? नागरिकांतून संतप्त सवाल
पाचेगांव खुर्द (प्रशांत मिसाळ):-नलवडेवाडी येथून पाचेगांव खुर्द कडे जाताना इंदूबाई विष्णू नलवडे या दुचाकीवरून पडून डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नलवडेवाडी येथील रहिवासी पण सध्या मुंबई येथे वास्तव्यास असणारे विष्णू भीमराव नलवडे हे काल रविवार दि. 9 रोजी सायंकाळी खाजगी बस ने आपल्या पत्नीसह मुंबईला जाणार होते. त्यासाठी ते दुपारी 4 च्या सुमारास नलवडेवाडी येथील घरातून पत्नीसह दुचाकीवरून पाचेगांव खुर्द येथून बसला बसण्यासाठी निघाले होते. त्यांची दुचाकी जुनमळा येथील एका पोल्ट्रीफॉर्म जवळ आली असता रस्त्यात असलेल्या खड्ड्यात दुचाकी अदळल्याने पाठीमागे बसलेल्या इंदूबाई नलवडे या गाडीवरून उंच बाजूला फेकल्या गेल्या. त्यांची दुचाकी ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात जाऊन थांबली. इंदूबाई नलवडे या जोरात पडल्याने त्यांच्या डोक्यात मार लागून भरपूर प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना पाचेगांव खुर्द येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार चालू होते.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला नलवडेवाडी पाचेगांव खुर्द रस्ता कधी दुरुस्ती होणार? प्रशासन एखाद्या वाटसरूचा बळी जायची वाट बघतंय की काय? असा संतप्त सवाल येथील उपस्थित नागरिकांतून करण्यात येत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी येथील नागरिकांतून अनेकदा निवेदने देण्यात आलेली आहेत. गावातील नेते व तालुक्यातील नेते यांच्यासह तालुक्याचे विद्यमान आमदार यांनाही वेळोवेळी निवेदने देऊन पण या रस्त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने येथील नागरिकांच्या मनात प्रशासन आणि विविध पक्षाचे नेते यांच्याविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचे येथील उपस्थितांकडून सांगण्यात आले.