उत्कर्ष प्राथमिक विद्यालयातील नवीन विद्यार्थ्यांचे मिकी माऊस जल्लोषात स्वागत

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचालित, उत्कर्ष प्राथमिक विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचे जल्लोषात मिकी माऊस सोबत हस्तांदोलन करीत स्वागत करण्यात आले.
मुलांच्या स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मिकी माऊस पाहून आनंद वाहत होता. प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मागाडेबाई उप मुख्याध्यापिका स्वरालीताई माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांच्या हस्ते प्रवेश द्वारावर गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य स्नेहल मडके, कार्तिकी मडके, कांचन इंगवले , माध्यमिक विभागाचे प्राचार्य कुलकर्णी सर व बालक मंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका संध्या शास्त्री यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. नवा वर्ग, नवे शिक्षक ,नवे पाठ्यपुस्तक सारे काही नवे असल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात गोड शिऱ्याचा आस्वाद घेऊन झाली.सेल्फी पॉईंटवर फोटो काढण्याचा आनंद मुलांसोबत पालकांनीही घेतला. पदाधिकाऱ्यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
सुट्टीनंतर प्रथमच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा वेगळाच होता.



