महुद मराठी शाळेत नवागतांचे स्वागत

जि.प.केंद्र शाळा महूद येथे इयत्ता पहिलीत येणाऱ्या नवगतांचे स्वागत मोठ्या उत्साहात झाले.सुरूवातीला शाळेतील महिला शिक्षिकांनी शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वारावरच औक्षण केले. नंतर सर्वात पुढे लेझीम पथक ,त्या पाठीमागे नवागत विद्यार्थी व पाठीमागे दुसरी ते सातवीचे विद्यार्थी अशी रचना करण्यात आली होती.
संग्राम सरतापे या विद्यार्थ्याच्या हलगीच्या ठेक्यावर शाळेतील शिक्षक व इतर विद्यार्थ्यांनी लेझीमताल धरला व मिरवणुकीत रूपांतर झाले.लेझीम पथकाने अतिशय सुंदर असे लेझीम नृत्य सादर करत नवागतांचे स्वागत केले. यावेळी मुले व पालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.नंतर इयत्ता पहीलीतील मुलांचे त्यांच्या वर्गात विशेष स्वागत करणेत आले.
फुगे ,रांगोळ्या, रंगीत झुरमुळ्यांचे कागद अशी सुंदर वर्ग सजावट पहिलीच्या वर्गशिक्षिका शितल चव्हाण मॅडम व संगीता केसकर मॅडम यांनी केली होती. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अशोक येडगे व उपाध्यक्ष सुनील जाधव, मुख्याध्यापक श्री महादेव नागणे सर,माजी मुख्याध्यापक जाधव सर यांचे हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शेवटी विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला.