गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू

छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी वर्षानुवर्षे विद्यार्थी मेहनत घेतात. घरापासून दूर राहून, आई-वडिलांपासून दूर राहून, वेळप्रसंगी पोटाला चिमटा देऊन स्पर्धा परीक्षांची तयारी केली जाते. पुणे , मुंबई, दिल्ली यांसारख्या महानगरात राहून एमपीएससी आणि युपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला जातो. दिवस-रात्र जागून विद्यार्थी भविष्याचे स्वप्न रंगवत असतात, पण किरकोळ कारणास्तव तुम्हाला परीक्षेपासून वंचित राहावे लागल्यास होणारा संताप शब्दात न वर्णन करता येणारा, असाच म्हणावा लागेल. देशभरात आज युपीएससी स्पर्धा 2024 ची प्रिलियम परीक्षा होत असून छत्रपती संभाजीनगर तब्बल 50 विद्यार्थ्यांना या परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे, मोठ्या उमेदीने स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगले आहे.

 

देशभरात आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षा पार पडत आहेत. संभाजीनगरमध्ये देखील मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी दाखल झालेत. मात्र, गुगल मॅपच्या चुकीमुळे यूपीएससीच्या अनेक विद्यार्थ्य़ांना आपल्या केंद्रावर पोहोचण्यासाठी एक-दोन मिनिटांचा उशीर झाला, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं. शहरात जवळपास 50 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागले. त्यावेळी अनेक विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं. जिल्ह्याच्या विविध भागांतून हे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. मात्र, परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी त्यांना उशीर झाला, त्याला कारणीभूत ठरलं ते गुगल मॅप अॅप. गुगल मॅपवरुन परीक्षा केंद्राचा शोध घेत हे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

 

विवेकानंद कला, सरदार दिलीपसिंग वाणिज्य महाविद्यालय औरंगाबाद  येथे आम्ही युपीएससी परीक्षेच्या केंद्रावर आलो आहोत. पण, गुगल मॅपवर हे कॉलेज केंद्र स्थळापासून 12 किमी दूरवर दाखवत आहे. वाळूज येथे हे कॉलेज गुगल मॅपवर दिसत आहे, गुगल मॅपवर कॉलेजचा पत्ता टाकल्यानंतर ते वाळूज येथे असल्याचे दिसून येते. सकाळी 9 वाजता विद्यार्थ्यांना रिपोर्टींग वेळ देण्यात आली होती. तर, 9.30 वाजता परीक्षा सुरू होणार होती. मात्र, 9 वाजून 2 ते 5 मिनिटांनी विद्यार्थी विद्यार्थी केंद्रावर पोहोचले. पण, परीक्षा केंद्रावरील संबंधितांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवून दिले नाही. आम्ही वारंवार विनंती केली, तरीही केवळ 2 ते 5 मिनिटांच्या उशिरामुळे अनेक विद्यार्थी युपीएससी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत, असे एका विद्यार्थ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, कॉलेजने गुगल मॅपवर तेच लोकेशन टाकले आहे, त्यामुळे या घटनेत कॉलेजच पूर्णत: दोषी आहे, असे म्हणत एका विद्यार्थ्याने संताप व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button