कटफळ नजीक भीषण अपघात; पाच महिलांना चिरडले

सांगोला तालुक्यात दिघंची -महूद रॊड वरील कटफळ (बंडगरवाडी स्टॉप ) नजीक एक भीषण अपघात घडला असून पंढरपूर-कराड मार्गावर भरधाव ट्रकने पाच महिलांना चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतातील कामे आटोपून घरी माघारी जात असताना हा अपघात झाला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आहे.
यामध्ये मृत्यू झालेल्या सर्व महिला सांगोला तालुक्यातील कटफळ गावच्या आहेत. पाच महिलाचा मृत्यू तर दोन महिला गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
इंदुबाई इरकर (वय ५०), भिमाबाई जाधव (वय ४५), कमल बंडगर (वय ४०), सुलोचना भोसले (वय ४५), अश्विनी सोनार (वय १३) जागीच ठार झाल्या. तर मनीषा पंडित (वय २५), मिनाबाई बंडगर (वय ५०) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज दुपारी चारच्या दरम्यान शेतातील काम करून घरी परतणाऱ्या 7 महिलांना, सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावातील बंडगरवाडी येथे एका ट्रकने चिरडले. यापैकी पाच महिलांचा मृत्यू जागीच झाला तर यामधील दोन महिला गंभीर जखमी झाल्या.
दरम्यान या सर्व महिला कटफळ गावच्या असून, बंडगरवाडीतून कामावरून सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी गाडीची वाट बघत उभ्या होत्या.
या दरम्यान कोळसा घेऊन जाणारा एक ट्रक आला आणि थेट महिलांच्या अंगावर गेला. ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेमुळे कटफळ गावावर शोककळा पसरली आहे.
अपघाताची माहिती कळताच शेकाप नेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली.
(बातमी अपडेट होत आहे.)