माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे ‘किशोर- किशोरी विकास’ प्रशिक्षण संपन्न

सांगोला तालुक्यात माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेचे बारा ते अठरा वयोगटातील किशोर किशोरींसाठी ‘किशोर किशोरी विकास वर्ग’ सुरु आहेत. त्यामध्ये किशोर किशोरींच्या व्यक्तिमत्व विकास वाढीचे उपक्रम घेतले जातात. सांगोल्यामध्ये संस्थेचे ८ किशोरी वर्ग व सांगोला, महूद, गार्डी व आचकदानी येथे 5 किशोर वर्ग सुरु आहेत.
सांगोल्याच्या आसपासच्या ग्रामीण भागात किशोर- किशोरींना या वर्गाची अत्यंत गरज भासते. म्हणून त्यांना मार्गदर्शन मिळावे व पुढील पिढी ही सुजाण नागरिकाची घडावी यासाठी किशोर – किशोरी वर्ग सुरु करणे गरजेचे आहे. यासाठी पुणे येथील सेवावर्धिनी या संस्थेतील तज्ञ मार्गदर्शकाना बोलावून डिसेंबर २०२३ मध्ये ३० महिलांना प्रशिक्षण दिले होते. त्याचा फायदा अनेक महिलांनी करून घेवून ‘किशोरी वर्ग’ सुरु केले. व त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडावी यासाठी संस्थेने बुधवार दि. १९ जून २०२४ व गुरुवार दि. २० जून २०२४ असे दोन दिवसाचे प्रशिक्षण सेवावर्धिनी, पुणे येथील तज्ञ मार्गदर्शकांना बोलावून ‘किशोर मित्र’ या नावाने घेतले.
प्रशिक्षणाची सुरुवात डॉ. शालिनी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सेवावर्धीनीचे प्रकल्प अधिकारी मा. प्रमोद कुलकर्णी यांनी किशोरी प्रशिक्षणार्थीना शुभेच्छा देवून केली. सेवावर्धिनी, पुणे येथील सौ. प्रीती पाटकर यांनी किशोरी वर्ग कसा घ्यावा त्याची पूर्व तयारी कशी करावी, कोणत्या वयोगटातील मुलांचा समावेश करायचा याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर सेवावर्धीनीची कार्यकर्ती कनिष्का जोशी यांनी प्रेझेन्टेशन द्वारे सोशल मिडीयाचा उपयोग, त्याचे फायदे तोटे हे समजावून सांगितले. दुसऱ्या दिवशी सौ गिरीजा सिरशिकर यांनी किशोर वयातील मुला-मुलींची गुण व वैशिष्ट्ये, या वयात होणारे मानसिक व भावनिक बदल, या वयात मुलांशी कसा संवाद करायचा याबाबत चर्चात्मक मार्गदर्शन केले. तसेच अधून मधून प्रेरणादायी गाणी व खेळ घेऊन आनंददायी वातावरणात महिलांना प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षण घेण्यासाठी देवळे, सोनंद, महूद, मेडशिंगी, वाढेगाव, वासूद तसेच सांगोल्याहून एकूण २६ महिला उपस्थित होत्या. महिलांनी आपल्या मनोगतातून प्रशिक्षण दिल्याबद्दल माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानचे व सेवावर्धीनीचे आभार मानले. किशोरीविभाग प्रमुख डॉ. केतकी देशपांडे यांनीही आपल्या मार्गदर्शनातून किशोरी बरोबर किशोर वर्ग सुरु करण्यास प्रशिक्षणार्थींना प्रवृत्त केले. व संस्थेकडून विनामुल्य मिळणारी प्रशिक्षणे घेवून स्वतःबरोबर इतर किशोर किशोरींचाही विकास करावा असे सांगितले.
प्रशिक्षणास किशोरीवर्ग प्रमुख डॉ. केतकी देशपांडे, संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. शालिनी कुलकर्णी यांनी उपस्थिती दर्शिविली. दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणाचा समारोप सौ मंगल कुलकर्णी यांनी केला.