कै.बापूसाहेबांनी  माणसांना माणसाशी जोडण्याच काम केलं-कवी प्रशांत केंदळे.

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल, प्राथमिक विद्यालय, पूर्व प्राथमिक व बालक मंदिर सांगोला स्नेहसंमेलन बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न
सांगोला(प्रतिनिधी):- माणसाशी माणूस नेहमी जोडायचं असतं आणि हे माणसांशी माणूस जोडण्याच काम गुरूवर्य बापूसाहेबांनी आपल्या जीवनामध्ये केले असे मत नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी श्री. प्रशांत केंदळे यांनी व्यक्त केले.
सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल, प्राथमिक विद्यालय, पूर्व प्राथमिक व बालक मंदिर यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष श्री. प्रबुध्दचंद्र झपके सर होते यावेळी व्यासपीठावर संस्थासचिव श्री.म. शं. घोंगडे सर, खजिनदार श्री.शं.बा. सावंत, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे, प्राथमिक विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक श्री. उदय बोत्रे, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका रोहिणी महारनवर, बालकमंदिरच्या  सविता देशमाने ,कवी श्री.सुनील जवंजाळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. संतोष बेहेरे, श्री. चेतन कोवाळे, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी प्रतिनिधी कु. ओंकार पवार, विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. रिंकू पवार, मराठी माध्यतील विद्यार्थी प्रतिनिधी कु.सौरव दिघे, विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. गीताई घोंगडे ,त्यांचे पालक व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके व कै. बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करून झाली.
पुढे बोलताना श्री. केंदळे म्हणाले की, स्वतः चा वकीली व्यवसाय असताना स्वातंत्र्याच्या अग्नीकुंडामध्ये स्वतः ला झोकून देऊन बापूसाहेबांनी तुरूंगवास भोगला. गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळाव म्हणून शिक्षणसंस्था स्थापन केली व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले आणि त्यांचाच वारसा घेऊन संस्थाध्यक्ष श्री. प्रबुध्दचंद्र झपके सर हे देखील  वाटचाल करीत आहेत असे सांगत संस्था व शिक्षकांबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी त्यांनी पाटी पुस्तक दप्तर आहे.शाळा माझी सुंदर आहे.मानवतेच्या संस्कारांचा परिपाठातून जागर आहे.ही कविता सादर केली. विद्यार्थ्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व त्यांनी कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूजनांबद्दल आदर ठेवावा तसेच यश मिळवता आलं पाहिजे त्यापेक्षा ते टिकवता आलं पाहिजे हा संदेश दिला. या दरम्यान त्यांनी मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीबद्दल विडंबन काव्य सादर केले. तसेच इतरही सुंदर कविता सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. तत्पूर्वी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे यांनी प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत केले व प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री.संगमेश्वर घोंगडे यांनी उपस्थितांना करून दिला तसेच प्राथमिक विद्यालयाच्या सहशिक्षिका शुभांगी पवार व दिपाली बसवदे मॅडम यांनी अहवाल वाचन केले.
स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित कला व विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रमुख पाहुणे व संस्थाध्यक्षांनी कौतुक केले. या नंतर इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमातील शालांतर्गत विविध गुणदर्शन, कला व विज्ञान प्रदर्शन आणि क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवणारया विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले त्याचबरोबर संस्थेकडे असलेल्या ठेवीतून इंग्रजी माध्यमातील इ. 10 वी, इ. 4थी त प्रथम व 5वी इंग्रजी विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देण्यात आले.
इंग्रजी माध्यमाचे बक्षीस वाचन कु. लता देवळे यांनी तर मराठी माध्यामाचे बक्षीस वाचन श्री. नानासाहेब घाडगे व इकबाल शेख यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जगन्नाथ साठे, रोहिणी महारनवर यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी पालकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दोन्ही माध्यमातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button