स्वेरीमध्ये ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा; संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांची प्रमुख उपस्थिती
पंढरपूरः गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच स्वेरी अंतर्गत असणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यंदाचे २०२२-२३ हे वर्ष स्वेरीचे रौप्य महोत्सवी वर्ष असून हे वर्ष विविध शैक्षणिक, सामाजिक आणि विधायक अशा विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे.
स्वेरी अंतर्गत असलेल्या डिप्लोमा फार्मसी तथा डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थिनी वैष्णवी काळे यांनी हिंदी मधून केलेल्या भाषणातून भारतीय संस्कृतीचा उत्तम पद्धतीने गौरव केला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपले मनोगत मांडताना प्राचार्य प्रा.मांडवे म्हणाले की, ‘२६ जानेवारी १९५० रोजी भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. आपल्या देशातील थोर देशभक्त व शहिदांच्या अपार त्रासातून मिळालेले हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे हे आपल्यापैकी प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाने देशाच्या विकासात योगदान देणे आवश्यक आहे.’ असे सांगून भारतीय प्रजासत्ताक दिनावर विशेष प्रकाश टाकला. यावेळी ‘स्वेरीयन’ या त्रैमासिकासह स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयातील सर्व विभागांच्या न्यूज बुलेटीनचे स्वतंत्ररित्या प्रकाशनही उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या ‘उन्मेष सृजन रंगाचा’ या युवा महोत्सवामध्ये रांगोळी विभागात स्वेरी अभियांत्रिकीच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील स्नेहल शंकर अंबुरे यांनी दुसरा क्रमांक पटकाविल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांच्या हस्ते पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, बालाजी सुरवसे, शिरीष भोसले यांच्यासह इतर शिक्षकेतर कर्मचारी व चारही महाविद्यालयांचे तसेच एम.टेक, एम. फार्मसी, एमबीए, एमसीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.सचिन भोसले यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे पालकांना प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम ऑनलाईन पाहण्याची सोय केली होती. या कार्यक्रमाचे सिया गडम, दत्तात्रय आहेरवाडी, प्रताप लऊळे व सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.यशपाल खेडकर यांनी सुत्रसंचालन केले तर मिठाई वाटपाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.