नाझरा विद्यामंदिर मध्ये योग दिन उत्साहात साजरा
योग जीवनाला आनंदी आणि उत्साही बनवतात-सिद्धेश्वर झाडबुके

नाझरा(वार्ताहर):- प्राचीन काळापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये योगाला अनन्य साधारण महत्त्व आहे. योग केल्याने मनाची शुद्धी होते, अंतर्मनाला प्रफुल्लित करण्यासाठी योग ही साधना अत्यंत आवश्यक आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये किमान अर्धा तास योग केला तर प्रचंड बदल आपल्यामध्ये घडून येतील.योग केल्याने आपल्यातील वियोग नष्ट होतील. योग जीवनाला आनंदी व उत्साही बनवतात असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक व योगसाधक सिद्धेश्वर झाडबुके यांनी केले.
नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य बिभीषण माने,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी क्रीडाशिक्षक सासणे यांनी उभे व बैठे योगाचे विविध प्रकार घेत विविध आसनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.प्रशालेतील शिक्षक संभाजी सरगर, प्रा. महेश विभुते,प्रा. मोहन भोसले,दिलावर नदाफ,वसंत गोडसे, योगसाधक सिद्धेश्वर झाडबुके यांनी स्टेजवरती योगाचे विविध आसन प्रकार विद्यार्थ्यांना करून दाखवले.
क्रीडाशिक्षक सासणे यांच्या मार्गदर्शनाखाली दहावीतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे मानवी मनोरे तयार करून कार्यक्रमात रंजत आणली.योगसाधक झाडबुके गुरुजी यांचा प्राचार्य बिभीषण माने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले.