रात्रीच्या वेळेस ड्रोनसदृश्य उपकरणे घिरट्या घालताना आले आढळून
महूद, ता.२८ : बारामती,माळशिरस तालुक्यानंतर सध्या सांगोला तालुक्यातील महूद परिसरातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळेस ड्रोनसदृश्य उपकरणे घिरट्या घालताना आढळून आले आहेत.यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत प्रशासनाने नागरिकांना माहिती देण्याच गरज व्यक्त केली जात आहे.
काही दिवसापूर्वी बारामती व माळशिरस तालुक्यातील गावांमध्ये रात्रीच्या अंधारात ड्रोन सदृश्य उपकरणे घिरट्या घालत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.काल बुधवार(ता.२६) रोजी रात्री साडेदहा वाजता सुमारास महूद परिसरात ही ड्रोन सदृश्य उपकरणे घिरट्या घालताना आढळून आलेले आहेत.महूद अंतर्गत असलेल्या धोकटेवस्ती,पवारवाडी, कांबळेवस्ती,चिकमहूद,बंडगरवाडी, लक्ष्मीनगर,कटफळ आदी परिसरात ही ड्रोनसदृश्य उपकरणे रात्री घिरट्या घालताना नागरिकांना दिसून आले. एकाच वेळी सुमारे चार ड्रोनसदृश्य उपकरणे घिरट्या घालत असल्याने नागरिकांमध्ये कमालीची घबराहाट निर्माण झाली. ही उपकरणे अवकाशात चमकताना दिसल्यानंतर नागरिकांनी एकमेकांना फोन करून सतर्क केले. शिवाय आपापल्या भागातील पोलीस- पाटील यांना फोन करून याबाबत माहिती विचारली.
रात्रीच्या वेळेस अवकाशात ड्रोनसदृश्य फिरणारी उपकरणे कशासाठी फिरत आहेत याचा उलगडा न झाल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.रात्रीच्या अंधारामध्ये वाडी- वस्तीवर ही उपकरणे दिसल्याने काही नागरिकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांना यश आले नाही. याबाबत सांगोला पोलीस व तहसीलदार कार्यालयाकडे नागरिकांनी चौकशी केली असता याबाबत काहीच माहित नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
दगड मारून ड्रोन पाडण्याचा प्रयत्न
रात्रीच्या अंधारात एकाच वेळी चार ड्रोन सदृश्य उपकरणे अवकाशात दिसल्याने घाबरलेल्या नागरिकांनी ही उपकरणे दगड मारून खाली पाडण्याचा प्रयत्न केला.मात्र उंचीवर असलेली उपकरणे पाडण्यात यश आले नाही.
महसूल प्रशासनाकडे याबाबत माहिती नाही
ड्रोनसदृश्य उपकरणे सांगोला तालुक्यातील महूद परिसरात घिरट्या घालत आहेत.ही उपकरणे कशाची आहेत,अशी विचारणा तहसीलदार संतोष कणसे यांच्याकडे केली असता तालुकास्तरावरून कोणत्याही अशा प्रकारच्या उपकरणांच्या वापरास परवानगी दिली नसल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगितले.
प्रशासनाने याबाबत नागरिकांना माहिती देण्याची आवश्यकता
महूद परिसरात काल रात्रीपासून ड्रोन्स सदृश उपकरणे घिरट्या घालत आहेत. यावर नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा होऊन चोरीसारख्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.नागरिकांमध्ये घबराहट पसरून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने नागरिकांना याची माहिती देणे आवश्यक आहे.- सुरेश कदम, चिकमहूद