सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील वाहतुक कोंडीच्या समस्येवर मुख्याधिकारी यांची समन्वयाची भूमिका….

सांगोला शहरातील जुन्या बाजारपेठेतील जी दुकाने काढण्यात आली त्यांना पर्यायी योग्य जागा देण्याची भूमिका सांगोला नगरपालिका प्रशासनाने घेतली. विनाकारण लहान व्यापारी व व्यवसायिक यांनाही त्रास होणार नाही आणि शहरात बेशिस्तपणा वाढणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. शेवटी लहान व्यापारी यांचाही उदरनिर्वाह व्यवसायावर चालतो, त्यामुळे त्यांचाही विचार करणे आवश्यक आहे. याप्रकरणी नगर पालिका प्रशासनाने सर्वांच्या समनव्यातून व चर्चेतून प्रश्न मार्गी लावण्याची भूमिका घेतली आहे.
राज्यशासना मार्फत निर्गमित पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) महाराष्ट्र योजना, 2017 नुसार पथ विक्रेते यांना व्यवसाय करण्यासाठी पोषक वातावरण पुरवणे व त्यास चालना देणे, हा याचा मुख्य उद्देश आहे. या प्रचलित धोरणास अनुसरून वाहतुकीस व रहदारीस अडथळा न होता छोटे व्यवसाकीय व संबंधित व्यापारी यांनी याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. शहरातील छोटे व्यावसायिक व व्यापारी यांचे दैनंदिन व्यवसाय व्यवस्थित सुरु ठेवण्यासाठी इतर पर्यायी व्यवस्था किंवा नगरपरिषदने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून रोजच्या वापराच्या जागेत व्यवसाय सुरु ठेवण्याबाबत उपाययोजना करण्यात येतील.
शहरातील सर्व व्यवसाय सुरुळीत चालावेत, नागरिकांना शहरात विना वर्दळ वावरता यावे, वाहतूक व रहदारीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण न होता सर्वांना एक प्रकारची शिस्त लागावी, शहरातील तसेच बाहेरून येणाऱ्या व्यावसायिक शहरात व्यवसाय करणे सुलभ व्हावे, यासाठी नगरपालिका पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) महाराष्ट्र योजना, 2017 धोरणीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिका नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी सांगितले.