महायुतीमधून कोणाला तिकीट मिळणार; ’बापू’ की ’आबा’ ?….; शेकापमध्ये दोन ’डॉक्टर बंधू’मध्ये रस्सीखेच

सांगोला(प्रतिनिधी) गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज असताना सुद्धा ऐनवेळी आमदार शहाजी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. तालुक्यात दोन्ही गट एकत्र आल्यामुळे अल्पमतात का होईना आमदार पाटील यांचा विजयी झाले होते. त्यापुढील काळातही दोघां आजी-माजी आमदारांनी एकत्रित काम केल्याचे दिसून आले. परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही गटाचे कार्यकर्ते मात्र आमचे नेते निवडणूक लढविणारच यावर जोर देऊ लागले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीमधून कोणाला तिकीट मिळणार? गेल्या वेळेस आबांच्या साथीने बापूंनी निवडणूक लढवली, आता बापूंनी साथ देऊन आबांनी निवडणूक लढवावी याविषयी चर्चा मात्र जोरदार सुरू झाल्या आहेत.
सांगोला तालुक्यात इच्छुक नेतेमंडळी लोकसभेला झालेल्या मतांची गोळा बेरीज, आकडेमोड करीत विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. महायुतीतील शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजी पाटील यांच्यासह विधानसभेला यावेळी फिक्सच असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील कामाला लागले आहेत तर महाविकास आघाडीमधील शेकाप पक्षातीलच डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख या बंधूमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच असणार आहे. सध्या प्रमुख नेतेमंडळींचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या नेत्यांच्या फोटोसह ’भावी आमदार’ अशा पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज्यात लोकसभेच्या निकालावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुती व महाविकास आघाडी मधील सांगोला तालुक्यातील नेतेमंडळी विधानसभेच्या तयारी करू लागले आहेत. गेल्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीच्या दीपक साळुंखे पाटील यांनी सहकार्य केले होते. राज्यातील पक्षीय आघाडी बाजूला सरून आबा – बापू एकत्र आले होते. या निवडणुकीत शेकापचा बालेकिल्ला असलेला तालुक्यात शिवसेनेचा धनुष्यबाणाने इतिहास घडविला होता. सध्या राजकीय परिस्थितीही वेगळी आहे. विद्यमान आमदार शहाजी पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हेही यावेळी निवडणूक लढवणारच यासाठी कामाला लागल्याचे दिसून येत आहे. यामुळे महायुती मधील ’आबा’ की ’बापू’ यांची चर्चा सुरू झाली आहे.
तसेच महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्षांमध्येही सर्व काही अलबेल आहे असे नाही. गेल्यावेळी निवडणूक लढवलेले डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासह त्यांचे चुलत बंधू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर डॉ. अनिकेत देशमुख यांनी आपले राहिलेले अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाहेर गेलेल्या कालावधीत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शेकाप पक्षामध्ये आपली मजबूत फळी निर्माण केली आहे. यामुळे शेकापमध्ये उमेदवारीसाठी दोन डॉक्टर चुलत बंधूंमध्ये रस्सीखेच असणार आहे. राज्यातील युती व आघाडी कोणत्या पक्षांमध्ये कशी होते यावरच येतील घटक पक्षाची व उमेदवारीची निश्चित होईल असे चित्र दिसून येत आहे.
बापूंच्या विरोधात किंवा बापूंच्या पाठिंब्याने – निवडणूक मात्र लढणारच –
गेल्यावेळी विधानसभेसाठा शेकाप पक्षाकडून निवडणूक लढविणारे डॉ. अनिकेत देशमुख याही वेळी निवडणूक लढविणारच यासाठी तयारी करीत आहेत. त्यांचे कार्यकर्तेही आमदार शहाजी बापूंच्या विरोधात किंवा बापूंच्या पाठिंब्याने निवडणूक मात्र निश्चितपणे लढवणार अशा पोस्ट प्रसिद्ध केल्याने या पोस्ट विषयी वेगवेगळ्या चर्चा मात्र चांगल्या रंगू लागली आहेत. डॉ. अनिकेत देशमुख यांना आमदार शहाजी पाटील यांचा पाठिंबा नेमका कसा मिळणार ? याविषयी जनसामान्यांमधून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
लोकसभेच्या मताधिक्याबरोबरच आतून-बाहेरुन प्रचाराची सुप्त चर्चा –
गेल्या वेळेस लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांना सुमारे साडेतीन हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना तालुक्यातून साडेचार हजार मताचे मताधिक्य मिळाले आहे. या मताधिक्याने महायुतीच्या नेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी मताधिक्यामध्ये कोणी आतून-बाहेरुन मदत केली याची चर्चा मात्र दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र लोकसभा व विधानसभेचे मैदान वेगळे असुन राजकीय वातावरणही वेगळेच असते याची जाणीव प्रत्येकनेत्यालाआहे.
दिपकआबांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याचा कार्यकर्त्यांनी धरला आहे आग्रह…..
मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांना विधानसभेची निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला कार्यकर्त्यांना उत्तर देताना मा. आम. दिपकआबा म्हणाले, गेली 35 वर्ष मी जो आदेश देईल तो कोणताही प्रतिप्रश्न न करता प्रामाणिकपणे पाळणारे कार्यकर्ते हेच माझे राजकीय भांडवल आहेत या पुढील काळात कार्यकर्त्यांना मी कोणताही आदेश देणार नाही तर कार्यकर्ते जी भूमिका ठरवतील तो निर्णय घेणार आहे जे कार्यकर्त्यांच्या मनात आहे तेच माझ्याही मनात आहे.