*सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला येथे इयत्ता दहावी गुणवंत विद्यार्थी- पालक- शिक्षक सहविचार सभा संपन्न*

*सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला येथे इयत्ता दहावी गुणवंत विद्यार्थी- पालक- शिक्षक सहविचार सभा संपन्न*
सांगोला:- दिनांक 29 जून 2024 रोजी दुपारी 3.30 वाजता सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये इयत्ता दहावी गुणवंत विद्यार्थी- पालक- शिक्षक सहविचार सभा अत्यंत आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाली.
या सभेमध्ये उपस्थित पालकांचे स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री सुरेश मस्तुद यांनी केले. विद्यार्थ्यांनी आनंदी वातावरणामध्ये मनावर कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता अभ्यास करावा. तसेच परीक्षेच्या दृष्टिकोनातून वेळेचे योग्य नियोजन केल्याने यशाचे शिखर सहज गाठता येते असे विचार व्यक्त केले. तसेच एस. एस. सी. बोर्ड परीक्षा मार्च 2024 च्या निकालाचे वाचन करून प्रशालेतील 64 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त करून यश मिळविल्याचे सांगितले. तसेच सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने 95 % पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या 23 विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे रोख रक्कम 23 हजार रुपये बक्षीस रूपाने तसेच सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केल्याचा उल्लेख करून इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घेऊन असेच उज्वल यश मिळवावे असे विचार आपल्या प्रास्ताविकामध्ये व्यक्त केले.
या सभेच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपप्राचार्या सौ सय्यद मॅडम उपस्थित होत्या. शिक्षक मनोगतामध्ये श्री शिवाजी चौगुले यांनी विद्यार्थ्यांनी सर्व विषयांचा समतोल अभ्यास करावा. उत्तर पत्रिकेतील अचूक मांडणीसाठी लिखाणाचा व प्रश्नपत्रिकांचा नियमित सराव करावा. तसेच बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने सर्व विषयातील संकल्पनावरती सखोल मार्गदर्शन केले.
पालकांमधून श्री संतोष भोसले, सौ दिपाली नागणे, डॉ. अजित नवले, श्री नारायण माळी यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य, सकस आहार, वेळेचे नियोजन, तणावमुक्त जीवन इ. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली. तसेच प्रशालेच्या वतीने विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी केले जात असलेल्या प्रयत्नाबद्दल समाधान व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य श्री अमोल गायकवाड यांनी पालकांनी आपल्या पाल्याच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले. आपल्या घरातील टी.व्ही. बंद करावा. तसेच आपला पाल्य मोबाईलचा अतिवापर करणार नाही याकडे लक्ष देण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवण्यासाठी सर्व विषयांचा सखोल अभ्यास करावा. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दृष्टीने मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अवघड संकल्पना कडून सोप्या संकल्पना कडे जावे. तसेच संस्थाध्यक्ष मा. प्रबुद्धचंद्र झपके, सहसचिव मा.प्रशुद्धचंद्र झपके हे विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी नेहमीच प्रयत्नशील असतात असे विचार व्यक्त केले.
सदर गुणवंत विद्यार्थी- पालक- शिक्षक सहविचार सभेचे सूत्रसंचालन श्री उन्मेश आटपाडीकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन गुणवंत विद्यार्थी विभाग प्रमुख श्री यतिराज सुरवसे यांनी केले. सहविचार सभेसाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते . सदर सभेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.