अकोला केंद्राची शिक्षण परिषद बाबरसपताळवाडी शाळेत उत्साहात संपन्न
अकोला केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबरसपताळवाडी येथे उत्साहात संपन्न झाली. या शिक्षण परिषदेचे अध्यक्षपद जि.प.गेजगेवाडी शाळेचे मुख्याध्यापक संजय बाबर यांनी भूषविले. माजी केंद्रप्रमुख बाळासाहेब चंदनशिवे,ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रय शास्त्रे , बाबरसपताळवाडी शाळेचे शा.व्य.स.अध्यक्ष समाधान केदार ,केंद्रीय मुख्याध्यापिका उज्ज्वला शिंदे हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपिठावर उपस्थित होते.
व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. केंद्रप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व नवीन शैक्षणिक वर्षाच्या शालेय कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.शकुंतला पांढरे, उज्ज्वला शिंदे, बाळासाहेब चंदनशिवे, चंद्रकांत भोरे, दत्तात्रय शिंदे यांनी विविध शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन केले. शैक्षणिक विषयांवरील चर्चेत सर्व गुरुजनांनी सहभाग नोंदवला.अध्यक्षीय मनोगतात संजय बाबर यांनी शिक्षण परिषद उत्कृष्ट व नियोजनबद्ध संपन्न झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच या शिक्षण परिषदेतून केंद्रातील सर्व गुरुजनांना एक ऊर्जा,नवा उत्साह,नवी प्रेरणा मिळाली याबद्दल बाबरसपताळवाडी शाळेचे कौतुक केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्रप्रमुख दत्तात्रय शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान केदार, मुख्याध्यापक दत्तात्रय बुंजकर, सहशिक्षिका सावित्रा कस्तुरे यांनी परीश्रम घेतले.
अकोला केंद्रातील माजी शिक्षक सतिश सपताळ सर यांची नुकतीच सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला. जि.प.प्राथमिक शाळा बाबरसपताळवाडी शाळेच्या वतीने केंद्रातील सर्व शाळांना तैवान पिंक पेरूची रोपे भेट देण्यात आली व त्या रोपांचे उत्कृष्ट संगोपन करणाऱ्या शाळेचा वर्षाअखेरीस सन्मान करणार असल्याचे घोषीत केले.त्यानंतर बाबरसपताळवाडी शाळेच्या वतीने केंद्रातील सर्व गुरुजनांना प्रिती भोजन देण्यात आले. दर महिन्याला होणारी ही शिक्षण परिषद केंद्रातील विविध शाळेत फिरते होणार असल्याचे केंद्रप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे केंद्रातील सर्व शाळा सर्व शिक्षकांना पाहता येतील.नवनवीन गोष्टी शिकता येतील,ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन सावित्रा कस्तुरे यांनी केले. उपस्थितांचे आभार दत्तात्रय बुंजकर यांनी मानले.