भारतानं 17 वर्षानंतर टी20 वर्ल्ड कप जिंकला; सांगोल्यात जल्लोष

सांगोला(प्रतिनिधी):- भारताने रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टी 20 वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवलं. दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. विश्वचषक सामना जिंकल्यानंतर सांगोल्यातही जल्लोष करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी कित्येकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. त्यामुळे दिवाळीप्रमाणेच वातावरण सर्वत्र बनून गेले होते. काही अतिउत्साही क्रिकेट प्रेमींनी तर हातातूनच फटाके उडवत आनंद व्यक्त केला. तर बर्याच जणांनी आपल्या घराच्या दारातच फटाके फोडून टीम इंडियाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अंतिम सामना जिंकताक्षणी अख्या सांगोल्यातील क्रिकेट प्रेमींनी जल्लोष करायला सुरुवात केली. शहरातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीची गाडी ही छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडेच वळत होती. त्यामुळे मध्यरात्री सांगोल्याचा मध्यवर्ती चौकात तरुणांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला.
सांगोल्यात क्रिकेट प्रेमींची संख्या अमाप आहे. कोणतीही महत्त्वाची मॅच जिंकल्यानंतर प्रत्येक सांगोल्यातील क्रिकेट प्रेमी हा आपला आनंद व्यक्त करण्यासाठी मध्यवर्ती चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातच येत असतो. याच पद्धतीने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यावर देखील शहरातील तरुणांनी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात गर्दी केले होती. यावेळी हातात भारताचा तिरंगा आणि भगवा ध्वज घेऊन चाहते पाहायला मिळत होते. यावेळी भारत माता की जय, जय श्रीराम, वंदेमातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय तसेच टीम इंडियाच्या विजयाच्या घोषणा देत सांगोल्यातील तरुणांनी घोषणांचा पाऊस पडला होता.