सेवानिवृत्त गुरुजींनी जपला पर्यावरण रक्षणाचा वसा.; भागवत पैलवान गुरुजींचे वृक्षप्रेम सर्वासाठी प्रेरणादायी.

सांगोला – वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे,असे तुकोबाराय सांगून गेले आहेत.जगतगुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेले हे बोल अनेक जण जाणतात.प्रत्यक्षात मात्र कृती कोणाकडून केली जात नाही.तरी देखील हजार व्यक्तीमागे एखादा जण असतो व तो ही उक्ती खऱ्या अर्थाने सार्थ करण्याचा प्रयत्न करतो.सांगोला शहरातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक भागवत पैलवान गुरुजी हे त्यापैकी एक आहेत.
वयाच्या अठ्याहत्तरीत असणाऱ्या पैलवान गुरुजींचे निसर्ग व वृक्षावर असणारे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. सांगोल्यातील पंचायत समितीच्या मागे असणाऱ्या यश नगर परिसरात त्यांचा रत्नाई नावाचा बंगला आहे. सेवानिवृत्ती नंतर बांधलेल्या या बंगल्यात छंद व आवड म्हणून त्यांनी छानसा बगीचा जोपासला आहे.कुंडीतील अनेक फुलझाडाप्रमाणे त्यांनी अनेक वृक्षांची लागवड केली आहे.त्यांच्या बंगल्याजवळून जाणाऱ्या सावे रोड वर श्री लक्ष्मीआईचे छोटे मंदिर आहे.त्या नाजिक असलेल्या रिकाम्या जागेत नगर पालिका कर्मचारी आरिफ मुलाणी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने खड्डे काढून पाच वृक्षांची लागवड केली.खड्डे काढून त्यात माती घालून,खत टाकून लागवड केली व त्यात पाणी घालून संवर्धन करण्याची हमी घेतली.
वड,पिंपळ,उंबर,गुलमोहर , कडूलिंब अशा पाच वृक्षांची लागवड करून पर्यावरण प्रेम व्यक्त केले.त्यासाठी त्यांनी मागील वर्षी स्वतःचा बागेत बादलीत रोपे लावून वृक्ष लागवडीची तयारी सुरू केली होती.लहान मुलांच्या संगोपनाप्रमाणे ही रोपे मोठी केली.मोठी झाल्यावर या वर्षी जागतिक पर्यावरण दिनाची आठवण म्हणून व आपुलकी प्रतिष्ठानच्या आवाहनास प्रतिसाद देवून त्यांनी मिञमंडळींच्या मदतीने वृक्षारोपण केल्या बद्दल त्यांचे आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी अभिनंदन केले आहे.त्यांच्या या कृतीचा प्रत्येकाने आदर्श घेवून प्रत्येकाने किमान पाच वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करावे,त्यासाठी आपुलकी प्रतिष्ठान व सांगोला नगर पालिका प्रशासन सहकार्य करेल असे यादव यांनी सांगितले.
या वेळी पैलवान यांच्या प्रमाणे त्यांचे चैतन्य हास्य क्लब मधील मित्र डॉ.कृष्णा इंगोले,प्रा.राजाभाऊ ठोंबरे, डॉ. मानस कमलापुरकर,राजेंद्र यादव यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.या कामी नगर पालिका कर्मचारी मासाळ व आरिफ मुलाणी यांनी सहकार्य केल्याबद्दल संतोष पैलवान यांनी आभार मानले.