सांगोला (वार्ताहर) शेती-वाडी किंवा इतर संपत्तीपेक्षा ज्ञान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती असून आजच्या काळात मूलभूत गरजांविना कोणतेही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्दिष्टानेच प्रतिवर्षीप्रमाणे SSC-1990 बॅचच्यावतीने मोफत गणवेश वाटप करण्यात आले असून यापुढेही विद्यार्थ्यांच्या शालेय गरजा ओळखून आम्ही त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन डॉ.महेश राऊत यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये SSC-1990 बॅचच्यावतीने करण्यात आलेल्या मोफत गणवेश वाटप प्रसंगी बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर युवा नेते बापूसाहेब भाकरे, उद्योजक शकील तांबोळी, विरेंद्र अरबळी, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, काकासाहेब नरुटे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार समर्पण करून पूजन करण्यात आले.
पर्यवेक्षक काकासाहेब नरुटे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू विशद करत मान्यवरांचे स्वागत केले व प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांना आपल्या भरीव अर्थसहाय्यातून मोफत गणवेश उपलब्ध करून दिल्याबद्दल SSC-1990 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव कोठावळे यांनी तर आभार पर्यवेक्षक प्रदीप धुकटे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख नरेंद्र होनराव, राजेंद्र ढोले यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.