दिपकआबा साळुंखे- पाटील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी कमल खबाले तर व्हाईस चेअरमनपदी माणिक मराठे

महूद, ता.९ : सांगोला येथील दिपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कमल तानाजी खबाले यांची तर उपाध्यक्षपदी माणिक मराठे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
विधान परिषदेचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत अध्यक्ष पदासाठी कमल खबाले यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी माणिक मराठी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सहाय्यक सहकारी अधिकारी तथा अध्यासी अधिकारी अमर गोसावी यांनी जाहीर केले.
या संस्थेच्या वतीने सभासदांना जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच ७.२० टक्के व्याजदराने पतपुरवठा केला जातो.सर्वसाधारण कर्ज मर्यादा आठ लाख रुपये असून शैक्षणिक कर्ज एक लाख रुपये तर तातडीचे कर्ज तीस हजार रुपये दिले जाते.तसेच सभासदांच्या मुलीच्या लग्नावेळी ह.भ.प. शारदादेवी साळुंखे-पाटील लक्ष्मीनारायण शुभमंगल योजनेतून तीस हजार रुपयांची मदत केली जाते. संस्थेच्या स्थापनेपासून प्रथमच अध्यक्षपदी महिला संचालकाला संधी मिळाल्याबद्दल शिक्षक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी, जिल्हा पतसंस्थेचे संचालक गुलाबराव पाटील, तालुका संघाचे अध्यक्ष मोहन आवताडे, तालुका पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब इंगोले आदींनी आपल्या मनोगतातून कमल खबाले यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी विकास साळुंखे,पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विश्वंभर लवटे,तानाजी खबाले,तानाजी साळे,कुमार बनसोडे,वसंत बंडगर, संजय गायकवाड,विलास डोंगरे,गोविंद भोसले,पल्लवी मेणकर-महाजन, महादेव नागणे,रफिक शेख,शिक्षक समितीचे प्रांतिक सदस्य प्रमोद कोडग, उमेश महाजन,संस्थेचे सचिव अमर कुलकर्णी आदी उपस्थित होते. तालुका संघाचे अध्यक्ष मोहन आवताडे यांनी सूत्रसंचालन केले तर विलास डोंगरे यांनी आभार मानले.