आषाढी यात्रा : पायी चालत आलेल्या भाविकांच्या मसाजची सोय..

पंढरपूर : पंढरपूर ते फलटण या पालखी मार्गावर वाखरी (ता. पंढरपूर) येथे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा शेवटचा मुक्काम असतो. यावर्षी शेवटच्या मुक्कामासाठी तब्बल ३० टक्के अतिरिक्त भाविक येण्याची शक्यता असल्यामुळे तब्बल १२ लाखांपेक्षा जास्त भाविक याठिकाणी येण्याचा अंदाज आहे. त्या धर्तीवर यंदा प्रथमच ६५ एकरच्या धर्तीवर वाखरीतही ५२ एकर परिसरात स्वतंत्र 15 एकर विस्तारीत पालखी तळाची संकल्पना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राबविली आहे.
.
  वाखरीच्या शेवटच्या मुक्कामासाठी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्या, भाविक यांच्याशिवाय इतर मार्गाने पंढरपूरकडे येणाऱ्या दिंड्या व पालख्याही माऊली-तुकोबाच्या भेटीसाठी वाखरी पालखी तळावर जात असतात. त्यामुळे पंढरपुरात दाखल होण्यापूर्वी संतांचा महामेळा वाखरी पालखी तळावर भरलेला असतो. त्यादृष्टीने त्यांना सोयीसुविधा देण्यासाठी वाखरी ग्रामपंचायत, पंढरपूर नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेमार्फत संपूर्ण जिल्हा प्रशासन सतर्क असते.
वाखरी पालखी तळावर भाविकांसाठी ४ हजार सुलभ शौचालये उभारण्यात आली आहेत. ५०० स्नानगृहे, हिरकणी कक्ष, आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारले आहेत. वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पालखी तळावर ठिकठिकाणी स्टॅन्डपोस्ट नळांची व्यवस्था केली आहे. टँकरना पाणी भरण्याची सोयही येथे केली आहे. आवश्यक त्या मोठ्या पालख्यांना राहुट्यांच्या जागी टँकर पुरविले जाणार आहेत. दिवाबत्तीची सोय व्हावी यासाठी ५५ ठिकाणी रोड लाईट, १० हायमास्ट दिवे पालखी तळावर बसविले आहेत. त्यामुळे रात्रीही हा पालखी तळ विद्युत रोषणाईने चकाकणार आहे. ठिकठिकाणी जंतुनाशक पावडर फवारणी, गप्पी मासे सोडणे, कंटेनर सर्व्हेक्षण, धूळ फवारणी आरोग्य विभागामार्फत भाविकांची काळजी घेतली जात आहे.
  पालखी तळ, रिंगण स्थळावर स्वतंत्र आरोग्य व्यवस्था
प्रमुख संतांच्या पालख्या वाखरीत दाखल होण्याअगोदर वाखरी, बाजीराव विहिर येथे सर्वात मोठा गोल व उभे रिंगण सोहळा संपन्न होतो. याठिकाणीही होणारी गर्दी लक्षात घेता स्वतंत्र आरोग्य व्यवस्था तैनात करण्यात आली असून प्राथमिक उपचार, आवश्यक असल्यास ॲम्ब्युलन्समधून इतर ठिकाणी ने-आण करण्याची सोय करण्यात आली आहे.
५००० झंडुबाम वाटप करणार.
आळंदी-देहू ते पंढरपूर या मार्गावर वाखरी हे शेवटचे मुक्कामाचे ठिकाण असते. त्यामुळे भाविक चालून चालून थकलेले असतात. त्यांना आरोग्याच्या सुविधा घेण्यासाठी इतर ठिकाणी जाणे अडचणीचे ठरत असल्याने पालखी तळावरच वाखरी ग्रामपंचायतीमार्फत भाविकांना तब्बल ५ हजार झंडुबाम व प्लॅस्टीकचा वापर टाळण्यासाठी ५ हजार कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी सावता शिंदे यांनी सांगितले…
मोफत मसाज सेंटर.
पायी चालून आलेल्या भाविकांचा थकवा घालविण्यासाठी वाखरी ग्रामपंचायतीमार्फत खास १२ लोकांची टीम मोफत मसाज करण्यासाठी पाचारण केली आहे. येथे आयुर्वेदिक तेलाने २० खुर्च्यांवर २४ तास मसाज करून भाविकांचा थकवा घालविण्यात येणार आहे.
—-
पंढरपुरातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून नदी पलिकडे ६५ एकर पालखी तळाचा विकास करून भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे चंद्रभागा वाळवंट, शहरातील गर्दीचा ताण कमी झाला होता. त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वाखरी पालखी तळावर यावर्षी येणाऱ्या भाविकांच्या अधिकच्या संख्येमुळे प्रशासनावर ताण येऊन चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून वाखरी-टाकळी बायपासच्या शेजारी ५२ एकर परिसरात स्वतंत्र १५ एकर पालखी तळ विकसीत करून त्याठिकाणी दिंड्यांच्या वास्तव्याची सोय करण्यात आली आहे. त्याठिकाणी दिंड्यांना रस्ते, पाणी, वीज आरोग्य सुविधा, भोजन देण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button