मिरज – पंढरपूर रोड वर वृक्षारोपण करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांना पत्र

मिरज – पंढरपूर रोड वर वृक्षारोपण करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांना पत्र
# पणजोबांनी केलेल्या कामाबद्दल मंत्र्यांकडे नातवाची मागणी
मुंबई / सांगोला (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागातील मैलकुली कै. नैमुद्दीन दादुभाई मुलाणी हे उदनवाडी गावाचे होते त्यांच्याकडे मिरज ते पंढरपूर या रस्त्याची देखभाल दुरुस्तीसह झाडे लावणे व जगणे हे काम होते. ते काम पुन्हा व्हावे म्हणून त्यांचे नातू रुग्ण हक्क परिषद मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले असता त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून उक्त मागणी केली आहे.
यावेळी सचिव मुलाणी म्हणाले की, माझे पणजोबा कै. नैमुद्दीन दादूभाई मुलाणी हे महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मैलकुली या पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे मिरज ते पंढरपूर या रस्त्याची देखभाल दुरुस्तीसह झाडे लावणे व त्यांची देखभाल दुरुती हे काम होते. असे माझे आजोबा बोलायचे. आज त्यांच्या पश्चात गेल्या तीन-चार वर्षांमध्ये मिरज पंढरपूर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. रुंदीकरण करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली वडाची झाडे तोडण्यात आली आणि रस्ता रुंदीकरण करण्यात आले. सध्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे वृक्षारोपण किंवा वडाचे झाडे लावण्याचे कोणतेही काम झालेले नाही. ही बाब मला अतिशय खेददायक वाटते. त्याअनुषंगाने मिरज ते पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा वृक्षारोपण करण्यासंदभार्त दि. 23/11/2021 रोजी पत्र शासनास व प्रशासनास लिहिले होते त्यावर राज्यमंत्री / सा. बां. मृद व जलसंधारण, वने प.दु.म., सा. प्र./ व्हीआयपी / 2021 / 2691 दि.25.11.2021 असे पत्र आम्हास प्राप्त झाले. त्यानंतर महाराष्ट्र शासन वन विभाग मुख्य वन संरक्षक ( प्रादेशिक ) यांचे कार्यालय क्र. कक्ष -2 (3)/ वृ. ला./ प्र. क्र. 10/ B – 132 / 2021 – 22 पुणे 411016 दि. 16/12/2021 रोजीचे वनसंरक्षक सामाजिक वनीकरण, पुणे यांना प्रत देण्यात आली. परंतु, अद्यापि कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून आम्ही पुन्हा महाराष्ट्र राज्य वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे आमची कैफियत मांडली असता त्यांनी तात्काळ भारत सरकार केंद्रीय रस्ते वाहतूक तथा एनएचएआय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून उक्त मागणी केली आहे अशी माहिती रुग्ण हक्क परिषद मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी दिली आहे.