नाझरा विद्यामंदिर मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा गुणगौरव समारंभ संपन्न

*जिद्द व चिकाटीनेच स्पर्धेत यशस्वी होता येत- प्राचार्य बिभिषण माने*
*नाझरा विद्यामंदिर मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा गुणगौरव समारंभ संपन्न*
नाझरा(वार्ताहार):- प्रत्येक क्षेत्रात सातत्याने स्पर्धा वाढत आहे.स्पर्धेच्या या युगात आपला पाल्य यशस्वी व्हावा गुणवंत व्हावा असे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते.पालकांच्या या स्वप्नाला सत्यात उतरवायचे असेल तर विद्यार्थ्यांच्या मनात जिद्द व चिकाटी असलीच पाहिजे तरच स्पर्धेच्या युगात यशस्वी होता येत असे प्रतिपादन नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बिभीषण माने यांनी केले.
प्रशालाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या इयत्ता पाचवी,आठवी शिष्यवृत्तीतील व महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाझरे गावच्या सरपंच मंदाकिनी सरगर अनकडाळ गावच्या सरपंच वैशाली बंडगर यांचे यजमान दर्याबा बंडगर,युवक नेते संजय सरगर,नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे आदी उपस्थित होते.इयत्ता आठवीतील शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सतरावा क्रमांक मिळवलेला विद्यार्थी पवनराजे शिंगाडे व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार समर्पित करण्यात आला. त्यानंतर इयत्ता पाचवी व आठवीतील जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने स्मृतीचिन्ह,सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन पालकांसमवेत मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र टॅलेंट सर्च या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक दिलावर नदाफ यांच्यातर्फे भेटवस्तू देऊन सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.नुकतेच एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण झालेला नाझरा विद्यामंदिर चा माजी विद्यार्थी ओंकार दादासो ननवरे यास मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना पालक दिगंबर शिंगाडे यांनी इयत्ता पाचवी आठवी त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेत शिक्षक कशा पद्धतीने कष्ट घेतात व विद्यार्थ्यांना यशस्वी कसे करतात याबद्दल सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारी शाळा म्हणून नाझरा विद्यामंदिर चा नावलौकिक असल्याचे त्यांनी सांगितले.त्यानंतर संजय सरगर व ओंकार ननवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे यादी वाचन दिलीप सरगर यांनी केले तर एम टी एस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे यादी वाचन दिलावर नदाफ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत गोडसे,सोमनाथ सपाटे प्रा. महेश विभुते प्रा.मोहन भोसले,महालिंग पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांनी मांडले.