pandharpur

सर्व यंत्रणांनी पुढील तीन दिवस अत्यंत दक्ष राहून काम करावे -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

HTML img Tag Simply Easy Learning    

पंढरपूर, दिनांक 15(जिमाका):- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी व भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मा. मुख्यमंत्री महोदयांनी या सुविधांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. तसेच काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, शौचालयाची संख्या वाढवणे, रस्त्यावरील होर्डिंग काढून रस्ते मोकळे करणे व अनुषंगिक सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व संबंधित विभागानी या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करावी व पुढील तीन दिवस अत्यंत लक्ष राहून आषाढी वारी यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

भक्तनिवास येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, उपविभागीय अधिकारी अमित माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश नवले, मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, आषाढी वारीनिमित्त दिनांक 17 जुलै 2024 रोजी माननीय मुख्यमंत्री च्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होते. यावेळी पंढरपूर शहरात किमान दहा ते पंधरा लाख भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने मागील दोन महिन्यापासून भाविकांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे यामध्ये काही ठिकाणी बदल तर काही सुविधांमध्ये वाढ करण्याबाबत सांगण्यात आलेले असून त्याप्रमाणे सर्व संबंधित विभागाने अत्यंत तत्परतेने कामे पूर्ण करून घ्यावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

पंढरपूर शहरातील रस्त्यावरील वीज वितरण कंपनीचे पोल तसेच चौका चौकामधील होर्डिंग नगर परिषदेने त्वरित काढून घेऊन रस्ते मोकळे करावेत. तसेच नगर परिषदेने रस्त्यावरील खड्डे त्वरित भरून घ्यावेत. चंद्रभागा वाळवंटातील चेंजिंग रूम ची संख्या वाढवून घ्यावी. ज्या ठिकाणी चिखल झालेला आहे अशा ठिकाणी त्वरित खडी व मुरूम भरून घेऊन पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. शहरात स्वच्छता राखण्यासाठी आधीकचे मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.

आरोग्य विभागाने अतिदक्षता विभागात फॅन व कुलरची संख्या वाढवावी. तसेच वाखरी पालखीतळ व 65 एकरवर आरोग्य सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्या ठिकाणीही फॅन व कुलरची व्यवस्था करून घ्यावी. रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी आरोग्य पथके तयार ठेवावीत. दुचाकी वरील आरोग्य दूत सेवा अत्यंत चोख राहील यासाठी दक्ष रहावे. वीज वितरण कंपनीने पुढील तीन दिवस पंढरपूर शहरात वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी दक्ष रहावे. पंढरपूर प्रांत अधिकारी यांनी मटन व चिकन शॉप बंद राहतील याबाबत आदेश काढावेत. चंद्रभागा नदीमध्ये बोटी चालवणाऱ्या नाविकांना लाईव्ह जॅकेटचे वितरण करावे तसेच विना जॅकेट नदीमध्ये बोट चालवल्यास संबंधिताची बोट सीज करण्याची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.

सर्व शासकीय विभाग प्रमुख त्यांच्यावर वारीच्या पार्श्वभूमीवर सोपवण्यात आलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत आहेत. परंतु शेवटचे तीन दिवस महत्त्वाचे असून प्रत्येकाने अत्यंत दक्षपणे दिलेली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!