गुरुजींच्या बदलीने चिमुकल्यांच्या डोळ्यात आले पाणी….

आपले लाडके गुरुजी या शाळेतून दुसर्या शाळेत जाणार ही गोष्टच मुलांना अस्वस्थ करणारी होती. चोपडी येथील गणेश नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोन गुरुजींमुळे खूपच नावारूपाला आली.राजाराम बनसोडे गुरुजी व शिवाजी आलदर गुरुजी यांनी शाळेचे रुपडेच बदलले. त्यातील शिवाजी आलदर गुरुजी यांची शासनाच्या नियमानुसार बदली झाल्याने विद्यार्थी खूपच नाराज झाले. दहा वर्ष एका शाळेत काम करून तेथील विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीबरोबर सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणारे गुरुजी म्हणून राजाराम बनसोडे व शिवाजी आलदर यांना ओळखले जाते. पालकांच्या सहकार्याने विविध प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या दोन्ही गुरुजींनी शाळेत प्रचंड मेहनत घेतली.दहा ते बारा किलोमीटर अंतरावरून पालक आपल्या मुलास या शाळेत आणून सोडत होते. विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या शाळेतील विद्यार्थी दरवर्षी चमकत होते त्यातीलच शिवाजी आलदर यांची बदली झाल्याने तेथील चिमुकल्यांचे डोळे पानावले होते.गुरुजी आम्हालाच अजून असायला हवे होते असे चिमुकल्यांचे बोलके डोळे सांगत होते, गुरुजींचा सत्कार होताना चिमुकल्यांचे पानावलेले डोळे हेच गुरुजींच्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरस्कार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. गणेश नगर परिसरातील सर्व पालकांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ संपन्न झाला.त्या भागातील सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र केंगार यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश खळगे यांच्या हस्ते संपूर्ण पोशाख मानाचा फेटा देऊन आलदर गुरुजी यांना सन्मानित करण्यात आलं. आलदर गुरुजी यांच्या पत्नी वनिता आलदर यांचा सन्मान वैशाली यादव यांच्या हस्ते करण्यात आला. नव्याने रुजू झालेल्या रूपाली पवार या शिक्षिकेचे स्वागत अंगणवाडी सेविका मेखले मॅडम यांनी केले तर नव्याने रुजू झालेल्या अंगणवाडीच्या मदतनीस सोनाली बाबर यांचा सन्मान विद्या खळगे यांनी केला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूपाली पवार यांनी केले.यावेळी राजाराम बनसोडे गुरुजी,शरद यादव,सहदेव विटेकर यांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दल व शिवाजी आलदर यांच्या बद्दल गौरव उद्गार काढले.
सत्काराला उत्तर देताना आलदर गुरुजी म्हणाले की या परिसरातील पालकांनी आमच्यावर विश्वास दाखवून मुले या शाळेत आणून घातली त्यामुळेच आम्ही त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देऊ शकलो. माझ्या जीवनातील अतिशय कठीण प्रसंगात ही या परिसरातील पालकांनी मला साथ दिली हीच माझ्यासाठी अत्यंत स्फूर्तीदायी गोष्ट आहे.पालकांच्या सहकार्यामुळेच ही शाळा नावारूपास आली आहे. यावेळी व्यासपीठावर संभाजी विटेकर, सचिन खळगे,संग्राम बाबर,नामदेव यादव,आर.बी. बाबर,नवनात डोंगरे,शैलेश पवार ,तात्यासाहेब बाबर,सुभाष बाबर, वसंत बाबर मनोज खंडागळे,प्रकाश गिड्डे यांच्यासह परिसरातील सर्व पालक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अनेक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी भेट वस्तू देऊन गुरुजींचा सन्मान केला. गुरुजींनी आम्हाला घडवले म्हणूनच आम्ही विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकलो अशा प्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. पालकांच्या वतीने सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आभार राजाराम बनसोडे गुरुजी यांनी मानले तर सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व परिसरातील पालक महिला यांनी विशेष परिश्रम घेतले.