देवकतेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रथमच गोल रिंगण सोहळा संपन्न

आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवकतेवाडी व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या पुढाकाराने प्रथमच भव्य दिव्य असे श्री हनुमान भजनी मंडळ देवकतेवाडी यांच्यासह ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांचां श्री हनुमान मंदिरासमोर पहिले गोल रिंगणसोहळा पार पडला. डोक्यावर भगव्या टोप्या, पालखी, पताका, तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. या कार्यक्रमासाठी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. एकंदरीत पंढरपूर वारीचे स्वरूप प्राप्त झाले होते. विठू नामाच्या गजरात अवघे देवकतेवाडी गाव दुमदुमून गेले होते.
भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा, पालखी दिंडी, चिमुकल्यांचा उत्साह, आणि यामध्ये गावकऱ्यांनी वारकऱ्यांची केलेली वेशभूषा यामुळे याची देही याची डोळा अनुभवता आला. डोळ्यात साठवावा अशा नेत्रदीपक रिंगण सोहळ्याचा अभूतपूर्व आनंद प्रत्येक भाविक वारकऱ्यांना सुखावून गेला. रिंगण सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांनी व महिलांनी ग्रामस्थांनी देखील फुगडी चा आनंद घेतला. माऊली माऊली चा नाम जय घोष करीत चिमुकल्या विद्यार्थ्यांची दिंडी देवकतेवाडी गावातून पुन्हा जिल्हा परिषद शाळेमध्ये पोहोचताच, ह. भ. प. गजानन शिनगारे महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कीर्तनातून समाज प्रबोधन करीत त्यांनी, व्यसनाधीन होऊ नका, आई-वडिलांची सेवा करा, समाजासाठी आणि गोरगरिबांसाठी मदत करा, झाडे लावा झाडे जगवा, मुलगी वाचवा, आपण शाळेला येताना काहीतरी घेऊन यावे शाळेतून काहीतरी घेऊन जाऊ नये याप्रमाणे पालकांना देखील अशा प्रकारचा संदेश दिला. या कीर्तनातून भाविक भक्त व विद्यार्थी देखील मंत्रमुग्ध झाले.
यावेळी नूतन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूसो देवकते, उपाध्यक्ष शोभा साळुंखे, माजी अध्यक्ष गजानन शिनगारे महाराज यांचा विशेष सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला. यामध्ये श्री हनुमान भजनी मंडळ देवकतेवाडी यांचा देखील फेटा बांधून श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आषाढी वारीनिमित्त दिंडी सोहळा यशस्वीरीत्या राबवण्यासाठी व दिंडीमध्ये सहभागी झालेल्या भाविक भक्तांना व शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच पालकांसाठी महाप्रसादाचे मोठे नियोजन करण्यात आले होते. गावातील नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्तपणे उदंड प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद देवकतेवाडी प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याकडून कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित नागरिकांचे स्वागत आणि आभार देखील मांनले.