लक्ष्मीदेवी विद्यामंदिर  सोनंदमध्ये आषाढीवारी दिंडी सोहळा संपन्न……

 दरवर्षीच्या परंपरेनुसार याही वर्षी लक्ष्मीदेवी विद्यामंदिर सोनंद प्रशालेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दशमीच्या दिवशी बालचमू दिंडी सोहळा आयोजित केला होता .

दिंडी सोहळ्याची सुरुवात संस्था सदस्या सौ अनिता भोसले मॅडम तसेच संस्था सदस्या सौ रजनी भोसले मॅडम यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली.याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य  श्री हेमंत आदलिंगे सर,मुख्याध्यापिका सौ पुष्पा महांकाळ मॅडम  ,पर्यवेक्षक श्री सुभाष आसबे सर,पर्यवेक्षिका सौ सुषमा ढेबे मॅडम ,सर्व शिक्षक वर्ग, शिपाईवर्ग ,वाहन चालकवर्ग तसेच पालक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.चोहीकडे उत्साहाचे वातावरण दिसत होते.एकादशीला चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा मेळा भरावा.तसेच दृश्य प्रशालेत दिसत होते. जिकडे पहावे तिकडे छोटे छोटे विद्यार्थी हातामध्ये झेंडा, गळ्यामध्ये टाळ, अंगामध्ये पांढरा पोशाख, डोक्यावर टोपी ,गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळावर चंदनाचा टिळा त्यावर बुक्का आणि अष्टगंध आणि मुखात हरिनामाचा जयघोष करत होते. त्याचबरोबर विद्यार्थीनींनी देखील डोक्यावर तुळशी ,गळ्यामध्ये टाळ ,काटपदर काष्टा साडी, भरजरी दागिने, नाकात नथ, केसांचा अंबाडा त्यावर आकर्षक असे रंगीबेरंगी माळलेले गजरे घालून महाराष्ट्रीयन संस्कृती जोपासताना दिसून आल्या.
या दिंडी सोहळ्यामध्ये शिक्षणाबरोबरच मुलांना महाराष्ट्रीयन संस्कृती, आध्यात्मिक , धार्मिक गोष्टींचे ज्ञान अवगत व्हावे म्हणून महाराष्ट्रीयन थोर संतांच्या भूमिका दिल्या होत्या. त्यामध्ये अनुक्रमे जगाचा पाठीराखा  विठूमाऊली, रुक्मिणी माता, एकनाथ , तुकाराम ,नामदेव सोपान ,निवृत्ती ,ज्ञानेश्वर माऊली, झाशीची राणी लक्ष्मीबाई , मुक्ताबाई, वासुदेव यासारख्या थोर संतांची वेशभूषा करून दिंडीमध्ये सहभागी झाले होते.
सकाळी ठीक नऊ वाजता प्रशालेतून या चिमुकल्या वारकऱ्यांचे स्कूल बस मधून सोनंद गावामध्ये प्रस्थान झाले. स्कूल बस सय्यदबाबा  मंदिराजवळ येऊन थांबल्या. आणि तिथून पायी दिंडीला सुरुवात झाली. सोनंद चौकामध्ये या दिंडीने विश्रांती घेऊन सोनंद नागरिकांपुढे विठ्ठलाच्या गाण्यांवर  समूह नृत्य , अभंग,गौळणी हरिपाठ, भारुड यासारखे मनोरंजनाचे कार्यक्रम केले. दिंडी सोहळ्याचे खास आकर्षण ठरलेल्या  कॉलेजच्या विद्यार्थ्यांपैकी मानेगाव चा  विद्यार्थी चि श्रेयश बाबर याच्या कोब्रा नावाच्या पांढऱ्याशुभ्र अश्वाने सुद्धा माऊली माऊली गाण्यावरती ठेका धरला. त्यानंतर हा दिंडी सोहळा गावातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन विसावला. तेथे विठू माऊली चे नामस्मरण, आरती झाल्यानंतर प्रशालेतील सहशिक्षक संगीत विशारद श्री अमोल केंगार सर यांनी भैरवी गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. त्यानंतर पुन्हा दिंडी सोहळा प्रशालेकडे मार्गस्थ झाला.
प्रशालेत आल्यानंतर दिंडीचे खास आकर्षण ठरले ते कोब्रा अश्वाचे रिंगण .माऊलींचे अश्व जसे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी उभे, गोल रिंगण करत असते त्याप्रमाणे या अश्वाने  सुद्धा प्रशालेत गोल रिंगण केले होते. त्यावर झाशीची राणी लक्ष्मीबाई च्या वेशात अवतरलेली कॉलेजची विद्यार्थीनी कु वैष्णवी माने  हातामध्ये तलवार, पाठीला ढाल बांधून स्वार झाली होती. या अश्वाबरोबर इयत्ता सातवीचे विद्यार्थी भालदार, चोपदाराच्या वेशभूषेमध्ये अश्वाच्या मागे धावताना दिसून आले .संस्था पदाधिकारी तसेच शिक्षकांना सुद्धा स्वतःचे तन ,मन ,भान विसरून हातामध्ये टाळ घेऊन मुखाने हरिनामाचा जयघोष करीत या अश्वाबरोबर गोल रिंगण घालण्याचा मोह आवरला नाही. अगदी आपण माऊलींचे रिंगण बघतो का काय हे पाहणाऱ्याच्या मनामध्ये भावना दिसून आली. या अश्वाबरोबर  विद्यार्थ्यांनी सुद्धा तीन गोल वेढे घालून गोल रिंगण पार केलं.
कार्यक्रमाची सांगता मुलींच्या झिम्मा फुगडी ने करण्यात आली. या दिंडी सोहळ्याचे सोनंद आणि परिसरातील सर्व पालकांमध्ये कौतुकाची चर्चा सुरू होती. प्रत्येक जण या दिंडी सोहळ्याच्या  शिस्तबद्ध नियोजनाचे कौतुक करत होता .हा दिंडी सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्था पदाधिकारी,प्राचार्य मुख्याध्यापिका,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,वाहन चालक वर्ग आणि विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.संस्था अध्यक्ष मा इंजि.बाबासाहेब भोसले  तसेच संस्था सचिव श्री आनंदराव भोसले यांनी मुंबईहून फोन कॉल करून या दिंडी सोहळ्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या . सौ ढेबे मॅडम यांनी आभार  प्रदर्शन व्यक्त  करून या बालचमू दिंडी सोहळ्याची सांगता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button