फायनल मॅचमध्ये लहान मुलासारखा रडला Messi, भर मैदानात घडला धक्कादायक प्रकार

अमेरिकेत झालेल्या कोपा अमेरिका फायनलमध्ये अर्जेंटिनानं विजेतेपद पटकावलं आहे. अतिरिक्त वेळेत मार्टिनेजनं केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर अर्जेंटिनानं कोलंबियाचा पराभव केला. अर्जेंटिनानं तब्बल सोळाव्यांदा विजेतेपद पटकावलंय. यापूर्वी 2021 साली झालेल्या कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिनानं ब्राझीलचा पराभव करुन विजेतेपद पटकावलं होतं.
भर मैदानात रडला मेस्सी
अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सीकडं या फायनलमध्ये सर्वाधिक लक्ष होतं. वर्ल्ड कपनंतर पुन्हा एकदा मेस्सी मोठ्या स्पर्धेची फायनल खेळत होता. या मॅचमध्ये त्याचा जादूई खेळ पाहायला मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण, त्याला मॅच पूर्ण होण्यापूर्वीच मैदान सोडावं लागलं.
अर्जेंटिनाला विजेतेपद मिळवून देण्याच्या निर्धारानं उतरलेल्या मेस्सीच्या घौडदौडीला 36 व्या मिनिटाला ब्रेक लागला. तो दुखापतग्रस्त झाला. मेस्सीच्या दुखापतीमुळे दोन मिनिटांसाठी खेळ थांबवावा लागला. दुसऱ्या हाफमध्येही दुखापतीनं मेस्सीचा पिच्छा सोडला नाही. 64 व्या मिनिटाला त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली. या दुखापतीनंतर मेस्सी मैदानातच कोसळला. त्याला पुढं खेळवणं शक्य नाही हे लक्षात येताच अर्जेंटिनाच्या कोचनं मेस्सीला परत बोलवलं.
मेस्सीनं निराश मनानं मैदान सोडलं त्यावेळी अर्जेंटिना आणि कोलंबिया या दोन्ही टीम 0-0 नं बरोबरीत होत्या. संपूर्ण फायनल मॅच खेळू न शकल्याची निराशा मेस्सीला लपवता आली नाही. तो भर मैदानातच रडू लागला. मेस्सीचं अपूर्ण कार्य त्याच्या टीमनं पूर्ण केलं. अर्जेटिंनानं कोलंबियाचा पराभव करत कोपा अमेरिका स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.