हरिनामाचा गजर करीत सांगोला विद्यामंदिर प्राथमिक व इंग्लिश मिडीयम स्कूलचा आषाढी पालखी सोहळा उत्साहात संपन्न.
विट्ठल विट्ठल जय हरि विठ्ठलाचा, हरिनामाचा गजर करीत सांगोला विद्यामंदिर पूर्व प्राथमिक, प्राथमिक विद्यालय आणि इंग्लिश मिडीयम स्कूलचा आषाढी पालखी दिंडी सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. तत्पूर्वी कै. बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्र मुख्याध्यापक उदय बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. तर पालखीचे पूजन इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सुकेशिनी नागटिळक, पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी महारनवर यांच्या हस्ते करण्यात आले.
सालाबाद प्रमाणे सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय, इंग्लिश मिडीयम स्कूल, पूर्व प्राथमिक विद्यालय यांची आषाढी पालखी सांगोला शहरातून उत्साही वातावरणात निघाली होती. सदर पालखी दिंडी सोहळा कचेरी रोड, जय भवानी चौक, मेन रोड, मणेरी गल्ली, महादेव गल्ली, कोष्टी गल्ली, वाढेगाव नाका भीमनगर समोरून सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम व प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात या पालखी दिंडी सोहळ्याचा शेवट झाला. तत्पूर्वी महादेव गल्ली येथील झपके वाड्यासमोर संस्था सदस्या शीलाकाकी झपके यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले.
या पालखी सोहळ्यात संतांच्या वेशभूषा परिधान केलेल्या सर्व विद्यार्थ्यानी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. तर सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यानी विट्ठल भक्तीपर गीतावर नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.
सदर पालखी सोहळा उत्साही वातावरणात पार पाडण्यासाठी मराठी माध्यमाच्या उत्सव विभाग प्रमुख मनिषा बुंजकर, इंग्रजी माध्यमाच्या उत्सव विभाग प्रमुख अनुपमा पाटणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर पालखी दिंडी सोहळ्याचे सूत्रसंचलन व आभार संगमेश्वर घोंगडे, नानासाहेब घाडगे यांनी केले.या पालखी सोहळ्यात दोन्ही विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विट्ठल, रखुमाई च्या तसेच संताच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या.शहरातील गुळमिरे यांनी दिंडी सोहळ्यातील सर्व विद्यार्थ्याना जिलेबी वाटप केली.