प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांच्या कॅन्सर वरील प्रोजेक्टला रिसर्च इनोवेशन अवॉर्ड प्राप्त.

वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आंध्र प्रदेश युनिव्हर्सिटी, आंध्र प्रदेश व अमेरिकन केमिकल सोसायटी (ए.सी.एस.) या नामांकित संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील “केमिस्ट्री इनोवेशन चॅलेंज केम स्पार्क 2025” ही संशोधन प्रकल्प स्पर्धा दि. 18 जुलै 2025 रोजी संपन्न झाली. सदर स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या स्पर्धेमध्ये सांगोला महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक व कॅन्सर संशोधक प्रा. डॉ. प्रकाश अरुण बनसोडे यांनी सहभागी होऊन “फेरोसिन लेबल्ड मॉलिक्युल्स अँड देअर अँटी कॅन्सर इव्हॅल्युएशन” या त्यांच्या संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण केले. सदर संशोधन प्रकल्पास स्पर्धेतील तज्ञ समितीच्या वतीने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
सदर संशोधन प्रकल्पामध्ये डॉ. बनसोडे यांनी रसायनशास्त्र प्रयोगशाळेत निर्मिती केलेल्या फेरोसिन संयुगांची कॅन्सर वरील औषधे बनविण्यासाठीची उपयुक्तता, जागतिक बाजारपेठेतील मागणी व व्यापारीकरण आराखडा याबाबतची अभ्यासपूर्ण मांडणी केली. सदर संशोधन प्रकल्प स्पर्धेमध्ये देशातील विविध राज्यातील संशोधकांकडून ऊर्जा, औषध निर्मिती, पर्यावरण, पाणी प्रक्रिया, विद्युत रसायनशास्त्र, पॉलिमर रसायनशास्त्र,नॅनो तंत्रज्ञान, जीव तंत्रज्ञान अशा विविध विषयावरील संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले. प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे हे सांगोला महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत असून त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची रसायनशास्त्र विषयातील पीएच.डी. मार्गदर्शक मान्यता प्राप्त आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ विद्यार्थी पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करीत आहेत.
तसेच ते सांगोला महाविद्यालयाच्या संशोधन व विकास विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी बौद्धिक संपदा कायदा, पेटंट्स व कॅन्सर जागरूकता याविषयी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये पार पडलेल्या संशोधन परिषदा व कार्यशाळा मधून मार्गदर्शनपर व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



