विराट कोहलीनं श्रीलंका दौऱ्यासाठी घेतला मोठा निर्णय, गौतम गंभीरचा मान राखणार, बीसीसीआयला कळवला होकार

भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू विराट कोहली देखील श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी उपलब्ध असेल. विराटनं बीसीसीआयला तसं कळवलं आहे.

 

(Team India) श्रीलंका दौरा पुढील आठवड्यापासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन सामन्यांची टी 20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची कारकीर्द देखील याच मालिकेपासून सुरु होत आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी 20 वर्ल्डकपनंतर संपला.

बीसीसीआयनं गौतम गंभीर याच्यावर मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवली. सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह हे प्रमुख खेळाडू खेळणार नाहीत अशा चर्चा आहेत. तर, हार्दिक पांड्यानं वनडे मालिकेतून माघार घेतलेली आहे.  रोहित  शर्मानं बीसीसीआयला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध असल्याचं कळवल्यानंतर विराट कोहलीनं देखील मोठा निर्णय घेतला आहे. विराट कोहली देखील श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध असणार आहे. बीसीसीआयला विराट कोहलीनं याबाबत कळवलं असल्याची माहिती आहे.

विराट कोहलीनं श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी उपलब्ध असल्याचं बीसीसीआयला कळवल्याची माहिती समोर आली आहे. श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा देखील खेळणार असल्याची माहिती आहे. गौतम गंभीरनं रोहित शर्मा, विराट कोहली सारख्या वरिष्ठ खेळाडूंनी श्रीलंका दौऱ्यात खेळलं पाहिजे अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार विराट कोहलीनं एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध असल्याचं बीसीसीआयला कळवलं आहे.  याबाबतचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.

रोहित शर्मा, विराट कोहलीची टी 20 मधून निवृत्ती 

भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिकंल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी निवृत्ती जाहीर केली होती. रोहित शर्मानं देखील निवृत्ती जाहीर केल्यानं भारताचा टी 20 चा नवा कर्णधार निवडण्याचं आव्हान बीसीसीआय पुढं आहे. बीसीसीआय, निवड समिती आणि प्रशिक्षक यांच्यात विविध नावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. टी 20 चा कर्णधार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं नाव चर्चेत आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी 20 मधून निवृत्ती घेतल्यानं दोघे आता केवळ एकदिवसीय सामने आणि कसोटी सामन्यांमध्ये खेळताना पाहायला मिळतील.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीपुढं आगामी काळातील चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद भारताला मिळवून देण्याचं आव्हान असेल. श्रीलंका दौऱ्यात संधी मिळाल्यास दोघे कशी कामगिरी करतात याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button