मोठी बातमी : लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन काम करणार नाही, अंगणवाडी सेविकांची भूमिका

कोणतीही योजना लागू झाली की त्याचे काम अंगणवाडी सेविकांकडून करून घेतलं जातं, पण मानधवन वाढीच्या त्यांच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष केलं जात असल्याची तक्रार महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन काम करणार नसल्याचं सोलापुरातील अंगणवाडी सेविकांनी म्हटलं आहे. केवळ ऑफलाईन फॉर्म स्वीकारून प्रकल्प कार्यालयात जमा करू, पण ऑनलाईन अर्ज भरणार नाही अशी भूमिका सोलापुरातील अंगणवाडी सेविकांनी घेतल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेने ही भूमिका स्पष्ट केली आहे.
सोलापूरसह राज्यात लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम सुरू आहे. काही ठिकाणी या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी पैसे घेत असल्याचं समोर आलंय तर काही ठिकाणी सर्व्हर डाऊनची समस्या सुरू आहे. अशात आता सोलापुरातील अंगणवाडी सेविकांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम न करण्याची भूमिका घेतली आहे. .
अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का?
मानधनवाढीसाठी सोलापूर जिल्हा परिषदिसमोर अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद आंदोलन केलं. महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणता मग अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का? असा सवाल यावेळी विचारण्यात आला. कोणीतीही योजना आली की तिचे काम अंगणवाडी सेविकांना दिले जाते, मात्र मागील अनेक महिन्यांपासून मानधन वाढीसाठी आंदोलन सुरु असताना त्याकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही अशी तक्रार अंगणवाडी सेविकांनी घेतली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकानं जाहीर केलेली योजना आहे. जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल, तर अजूनही अर्ज करण्याची मुदत संपलेली नाही. तुम्ही अर्ज करू शकता. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमाहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच, प्रतिवर्ष 18 हजार रुपये मिळणार आहेत.