लोककलावंतांचे सांगोला येथे आंदोलन संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):- लोककलावंतांचे विविध मागण्यांसंदर्भात काल गुरुवार दि. 18 जुलै रोजी सांगोला तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
प्रारंभी सकाळी 10.00 वाजता महात्मा फुले चौकातून महापुरूषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली.यावेळी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील लोककलावंत प्रबोधन परिषदेचे 36 जिल्हाध्यक्ष यांच्यासह नामवंत कलाकार बांधव उपस्थित होते.
आंदोलनाप्रसंगी नामवंत कलाकारांनी पोवाडा, वाघ्या मुरळी, धनगरी ओव्या, पोतराज, सुरसनई, हलगी, ढोल ताशा, गोंधळ असे विविध कलाप्रकार सादर केले. आंदोलनास आ.शहाजीबापू पाटील, दिपकआबा साळुंखे-पाटील, डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दिला.यावेळी विविध मागण्याचे निवेदन नायब तहसिलदार यांनी स्विकारले.
सांस्कृतिक कार्यक्रम मिळणेबाबत, सांस्कृतिक विभागाच्या विविध योजनेचा लाभ वृध्द कलावंत मानधन, मयत कलावंतांच्या वारसाला वारस प्रमाणपंत्र मिळणेबाबत, मानधन निवड समिती स्थापन करण्याबाबत 3 वर्षापासूनचे प्रलंबित वृध्द कलावंतांचे प्रस्ताव अर्ज निकाली काढणेबाबत, जिल्हा निवड समितीमध्ये सदस्य हा कलावंत व कलेची जान असणारा घ्यावा, कलावंतंच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला स्पिकर परवाणगी मिळावी, कलावंतांचे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. महाराष्ट्रातील बँड, बँजोच्या मॉडिफाय गाड्या यांना रितसर आर.टी.ओ. ऑफिस मार्फत त्यांचे वार्षिक शुल्क घेऊन परवाना द्यावा, सांस्कृतिक कार्य संचालनालयाला वृध्द तरूण विविध लोककला सादर करणार्या लोककलावंतांचा सर्वे होऊन कलावंत म्हणून नोंद व्हावी आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
आंदोलनप्रसंगी बापूसाहेब ठोकळे, शहिर सुभाष गोरे, शाहिर देवानंद माळी, शाहिर बाळासाहेब मालुसकर, शाहिर राजेंद्र गवई, शाहिर बजरंग आंबी, शाहिर रंगराव पाटील, शाहिर नानाभाऊ परिहार, निरा दळवी, तमाशा सम्राट महादेव मनवकर सह महाराष्ट्रातील नामवंत शाहिर व सांगोला तालुक्यातील लोकवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.