मनोज जरांगे आजपासून उपोषणाला बसणार, मागणी काय?
समाजाला ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण द्यावे ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे.

मराठा आंदोलक आज शनिवारी 20 जुलैपासून पुन्हा एकदा अमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी याबाबतची या आधीच घोषणा केली होती. त्यानुसार जालन्याच्या अंतरवली सराटी इथे ते उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण द्यावे ही त्यांनी मागणी आहे. सरकारने निर्णय घ्यावा यासाठी त्यांनी अल्टिमेटमही दिले होते. सरकाने चर्चा करून त्यांना आश्वासनही दिले होते. पण अजूनही त्यात काही होत नाही या पार्श्वभूमीवर त्यांनी आता उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
मनोज जरांगेंची मागणी काय?
सगे सोयरेची अंमलबजावणी व्हावी, ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्यावे ही मनोज जरांगेंची मागणी आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. ओबीसीतून देवू नये अशी त्यांची ही मागणी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 13 जुलैला जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला होता. त्यावेळी त्यांनी आपण 20 जुलैपासून उपोषणासा बसणार असल्याचे स्पष्ट केले होते.
मनोज जरांगे यांनी शांतता रॅलीत महायुती सरकार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता महायुती आणि महाविकास आघाडीचं सरकार येत नसतं. मराठासारखी कट्टर जात पृथ्वीवर नसेल. येवल्यातील छगन भुजबळांच्या नादी लागून तुमची सत्ता जाणार. सरकारनं मराठ्यांचा अंत पाहू नये, असा इशारा त्यांनी दिला होता. शिवाय 288 पाडणार असा सुचक इशाराही त्यांनी दिला होता. त्याच वेळी त्यांनी 20 तारखेपासून अंतरवाली-सराटीमधून आमरण उपोषण सुरु करतोय, आता माघार नाही, अशी घोषणा दिली होती.
पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने मराठ्यांना धोका दिल्याने पुन्हा एकदा उपोषणाची वेळ आली आहे. समाजासाठी मी आमरण उपोषण करत आहे. समाजाचे फक्त मी एवढंच ऐकत नाही. समाज मला आमरण उपोषण करू नका, असे म्हणत होता. सगेसोयरेची अंमलबजावणी करा, गुन्हे मागे घ्या, तीनही गॅझेट लागू करा. आरक्षण द्यायचे असेल तर बहाण्याची सरकारला गरज नाही. मराठा समाजाच्या मुलांना नोकरभरती, ऍडमिशनमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, धनगरांना आरक्षण द्यायचं नाही. नवीन काहीतरी योजना आणतात, लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी-लाडका मेहुणा योजना आणतील, अशी टीका त्यांनी सरकारच्या योजनेवर केली आहे. या योजनेमुळे तिथे गर्दी झाल्यामुळे साईट बंद पडले आहेत. एवढा लोड त्या ठिकाणी आलेला आहे. सरकारने हा डाव टाकलेला आहे. तिथे झालेल्या गर्दीमुळे ऍडमिशनला मुलांचा गोंधळ उडत आहे. सर्व जातींना अशा योजना जाहीर करून तुम्ही आरक्षणापासून वेगळं करू शकत नाहीत. तुम्ही 1500 रुपये देतात ते तीन दिवस पुरणार नाहीत. 1500 रुपये घेऊन आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
ते पुढे म्हणाले की, मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे लागेल. कोणीही अंतरवलीकडे येऊ नका, इकडे पाऊस आहे, कामाचे दिवस आहेत. लाडसाहेब म्हटले होते की, एसपीचा विषय नाही सीपीचा म्हणतात, आम्ही खेड्यापाड्यातील बोलताना, अस म्हणत असतो. काही पोलीस अधिकाऱ्यांकडून जातीयवाद सुरू आहे. बोगस पुस्तक गोळा करून ते आयएएस बनतात.