कळी उमलताना उपक्रमांतर्गत आरोग्यविषयक मार्गदर्शन संपन्न

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल मध्ये इनरव्हील क्लब सांगोला अंतर्गत भारतीय स्त्री शक्ती संचलित मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र यांच्यामार्फत इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी कळी उमलताना या उपक्रमांतर्गत मुलींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन घेण्यात आले.
यावेळी भारतीय स्त्री शक्ती संचालित मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राच्या उपाध्यक्षा ॲड. मनीषा भुसेकर मॅडम, उपसमिती सदस्या क्षमा नष्टे मॅडम, अंजली पवार मॅडम ,इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्वाती अंकलगी मॅडम, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. सुकेशनी नागटिळक उपस्थित होत्या.
किशोरवयीन ते कुमारवयीन वयाच्या टप्प्यातील मुलींचे भावविश्व जाणून घेण्याचा प्रयत्न इनरव्हील क्लब सांगोला व मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र यांच्याद्वारे करण्यात आला. आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल आपल्याला किती माहिती असते? फारशी नाही किंवा असली तर त्यात गैरसमजाचा भाग अधिक असतो. आपल्याला पौगांडावस्थेत आपल्या शरीराची हळूहळू ओळख व्हायला लागते; याच काळात शरीररचना कार्य आदींची शास्त्रीय माहिती मिळणे आवश्यक असते याबद्दल भारतीय स्त्री शक्ती संचलित मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राच्या उपाध्यक्षा ॲड. मनीषा भुसेकर मॅडम यांनी माहिती सांगितली. स्त्री शरीराची अंतर्गत रचना, वयात येताना शरीरात होणारे बदल, पाळीच्या संबंधातील सर्व प्रकारचे विकार याबद्दल उपसमिती सदस्या क्षमा नष्टे मॅडम यांनी पीपीटी द्वारे माहिती दाखविली.
मुलींसाठी अतिशय उपयुक्त माहिती मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राकडून देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. लता देवळे यांनी केले.