कुठेतरी चिंतन व्हायला हवे….

पुण्यात पावसाचा धुमाकूळ पहायला मिळत आहे.त्या शहरातील चित्र पाहिल्यानंतर पावसाचा हाहाकार काय असतो हे आपल्याला लक्षात यायला लागेल.बुधवारी रात्री आणि गुरूवारी दिवसभर पुणे शहरात माणसाच्या छातीला लागेल इतके पाणी साचले होते.जे बाहेर पडले होते,ते बाहेरच आणि जे घरात होते ते घरातच अडकून पडले.  खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पुणे शहर व आसपासच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे हे एक कारण पुढे आले आहे.
काही ठिकाणी साचलेल्या पाण्याची पातळी 2 ते 3 फूट इतकी  होती.  खडकवासला धरण व धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे उपमुख्यमंत्री  व पुण्याचे पालकमंत्री  अजित पवार यांनी सांगितले.  या पार्श्वभूमीवर शासन आणि शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. मुख्यमंत्री  एकनाथ  शिंदेंनी प्रशासकीय यंत्रणेला मोबाईलवर संपर्क साधून सतर्क राहण्याचे आदेश दिले  तसेच, पूर्णवेळ रस्त्यावर उतरून अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याचेही आदेश दिले.
दोन तीन वर्षातून अतिवृष्टी होते.कधी कधी अवर्षण स्थिती उद्भवते. हा निसर्गाचा नियम आहे.नद्यांना पूर येणे हे काही नवीन नाही.पूर्वापार ही स्थिती चालत आली आहे  पण आज मोठमोठी शहरे अतिवृष्टीच्या काळात पाण्यात का जातायेत,याचा कुठेतरी विचार करावा लागणार आहे. मुंबई प्रमाणे  पुण्यावरही हे संकट सातत्याने ओढवत आहे.   पुण्यात खडकवासला धरणात आणि पाणलोट क्षेत्रातही खूप पाऊस पडला. मावळमध्ये जवळपास 255 मिमी पाऊस पडला.
मुळशीमध्ये 70 मिमी पाऊस पडला. त्याचा दुहेरी फटका पुण्याला  बसला आहे. म्हणून पुण्यात सर्व परिसरात पाणी झाले आहे,असा मुख्यमंत्र्यांचा निष्कर्ष आहे. आपत्ती व्यवस्थापन दल आणि  स्थानिक यंत्रणा  काम करत आहे मात्र, स्थिती हाताबाहेर गेल्याने आर्मीला पाचारण करण्यात आले आहे.  आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या रेस्क्यू टीमही तैनात ठेवण्याची सूचना शासनाकडून करण्यात आली आहे कारण पाऊस कधी थांबेल हे सांगता येत नाही.
 पुण्यामध्ये  अनेक भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सिंहगड रोड परिसरामध्ये अनेक भागांत दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. नागरिकांना वाचविण्यासाठी बचावपथकाने जिवाची बाजी लावली. खडकवासला धरणातून पहाटेच्या सुमारास पाणी सोडल्यामुळे अनेक भाग जलमय झाले असून नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरले. पुणे व आसपासच्या भागात अतीमुसळधार पावसाचा रेड अलर्ट  बुधवारीच देण्यात आला होता. वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर ही धरणे कमी भरली होती. त्यामुळे पुण्याला निम्मा काळच पाणी पुरेल अशी स्थिती होती. पण आपल्याकडचे  खडकवासला धरण पावणे तीन टीएमसीचंच आहे. खडकवासलाच्या वरच्या भागात 8 इंचापेक्षा जास्त पाऊस पडला. पुण्यात जवळपास पाच इंच पाऊस झाल्याने ही पूरजन्य स्थिती उद्भवल्याचे सांगण्यात येते.
खडकवासला धरण तर लगेच भरते. धरण पावणेतीन टीएमसी आणि वरून साडेतीन टीएमसी पाणी आल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडावे लागले. 45 हजारांपेक्षा जास्तीचा विसर्ग धरणातून सोडला गेला.  पहाटे पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. रात्री  पाणी सोडले असते  तर लोक झोपेत असतानाच त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले  असते. त्याचा लोकांना त्रास झाला असता.पवना 70 टक्के भरले आहे.  पण वरच्या भागात 15 इंच पाऊस झालाय.मुळशी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. पुण्यात निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीमध्ये एनडीआरएफची बचावपथके  काम करत आहेत.
पहाटे  तीनच्या सुमारास नदीला पाणी सोडण्याच्या वेळी नदीपात्रात अनधिकृतपणे अंडाभुर्जी वगैरेच्या हातगाड्या उभ्या होत्या. पहाटे तिथे तीन जणांचा मृत्यू झाला. तिथे त्यांना विजेचा शॉक बसला. पाऊस सुरू झाल्यानंतर नदीकाठचे बहुतेक लाईट कनेक्शन बंद केले होते. पण स्ट्रीटलाईट चालू होते.शासनाकडून जे निष्कर्ष मांडले गेले ते एकवेळ मान्य करूयात पण मुंबईसारखी पुण्याची गत का होते आहे,यावर कुठेतरी चिंतन व्हायला हवे.
पावसाच्या पाण्याचा निचरा कशातून होतो.नद्या,नाले आणि ओढे यातूनच ना. मुंबईप्रमाणे पुण्यातही नागरिकीकरण भरमसाठी वाढत आहे.बाहेरून तिथे तळ ठोकणार्‍यांची संख्या वाढत आहे.नागरिकीकरणातून बिल्डर्स लॉबीची चांदी होत असते.पुण्यात तेच चित्र दिसत आहे.गगनचुंबी इमारती उभ्या राहात आहेत.हे बिल्डर लोक शहरातील ओढे,नाले,छोट्या नद्या याचा विचार करत नाहीत.त्यांना केवळ नफा पाहिजे असतो तिथे जावून राहाणार्‍यांना घर पाहिजे असते. पुण्याची स्थिती अशी आहे की,अनेक नद्या शहरातूनच वाहात असतात.ओढे,नाले बिल्डरांच्या घशातच चालले आहेत.तेव्हा पाण्याचा निचरा होतच नाहीय.हे पाणी शहरातच इतरत्र पसरू लागले आहे.
मुंबईची मिठी नदीच नागरिकीकरणात गायब झाली आहे. नागपूर शहर देखील तेच हाल भोगत आहे. मग नागरिकीकरण थांबवायचे काय,असा प्रश्न या चर्चेतून पुढे  आणला जावू शकतो. नागरिकीकरण थांबवता येणार नाही पण घरे बांधताना जी काळजी घ्यायला पाहिजे,ती घेतली जात नाही,हीच शोकांतिका आहे. छोट्या नद्या,नाले,हे सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. अशा आपत्तकालीन स्थितीत दोष कुणाला दिला जातो तो महानगरपालिकांवर. मोठ्या शहरांचा विचार केला तर महानगरपालिकांची यंत्रणाही निष्क्रिय ठरते आहे.पुण्यात या अगोदर उद्भवलेली स्थिती पाहाता पालिकेने वेळीच उपाययोजना करायला हव्या होत्या.बैल गेला झोपा केला,अशी राज्यातील सर्वच महापालिकांची अवस्था आहे. शासनही थातूर मातूर उत्तरे देवून मोकळे होत असते.पालिका यंत्रणा गाफिल रहात असते.त्रास मात्र जनता भोगत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button