सांगोला (वार्ताहर) विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनात लोकसेवा-राज्यसेवा आयोग,बॅन्किंग यासारख्या विविध स्पर्धा परीक्षांचा पाया हायस्कूल जीवनातील शिष्यवृत्ती परीक्षांच्या माध्यमातून तयार होत असून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेची जाणीव व यशाची आवड याच वयात निर्माण होणे आवश्यक असल्याचे मत प्राचार्य अमोल गायकवाड यांनी इयत्ता आठवी शिष्यवृत्तीच्या पालक सभेवेळी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापिका शाहिदा सय्यद, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, संस्था व प्रशाला बाह्यपरीक्षा प्रमुख नामदेव खंडागळे व वैभव कोठावळे, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख रमेश बिले उपस्थित होते.
पुढे बोलताना विद्यार्थी-शिक्षक-पालक हा त्रिकोण महत्त्वपूर्ण असून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व जिद्द निर्माण होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील राहिल्यास अपेक्षित यश शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना योग्य आहार व ताण-तणावमुक्त वातावरण देत सांगोला विद्यामंदिरच्या गुणवत्तेची परंपरा अखंड ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
सभेचे प्रास्तविकातून पर्यवेक्षक प्रदीप धुकटे यांनी सर्वांचे स्वागत करत सभेचे उद्दिष्ट जाहीर केले. विभाग प्रमुख रमेश बिले यांनी मार्गदर्शन वर्ग 2024-25 ची आतापर्यंतची वाटचाल व पुढील कार्यवाही विस्तृतपणे विशद केली. प्रशाला विभाग प्रमुख वैभव कोठावळे यांनी मागील निकालाचा आढावा घेत पुढील अपेक्षापूर्तीसाठी करावे लागणारे प्रयत्न थोडक्यात मांडले.
अजित पाटील, देवयानी कांबळे, नेहा जवंजाळ यांनी विद्यार्थी शिस्त व अभ्यासाविषयी सूचना करत आपल्या पालक मनोगतातून शिष्यवृत्ती नियोजन व शिक्षकांचे प्रयत्न याविषयी समाधान व्यक्त केले.सभेचे सूत्रसंचालन शुभांगी पलसे यांनी तर आभार प्रदर्शन सुवर्णा कांबळे यांनी केले.यावेळी भाग्यश्री मिरजे, सचिन बुंजकर, महेश ढोले या शिक्षकांसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.सभा यशस्वी करण्यासाठी विभागातील शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले