कै.बापूसाहेब झपके स्मृती समारोह राज्य निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धा : सोलापूरचे संघ साखळीतच गारद
मुंबईसह पुणे, बीड, साताराचे संघ उपांत्यपूर्व फेरीत

सांगोला ( प्रतिनिधी ): कै. गुरुवर्य च. वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या ४३व्या स्मृती समारोहानिमित्त राज्यस्तरीय पुरूषांच्या निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धेत मुंबईच्या घाटकोपर वायएमसीए, घाटकोपर क्रीडा प्रतिष्ठान, मॅनिक स्पोर्ट्स अकॅडमी, इंडियन जिमखाना व प्रोनेट्स क्लबने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
येथील सांगोला विद्यामंदिरच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत डेक्कन जिमखाना पुणे, जय हिंद जिमखाना कडा (बीड) व एनव्ही अस सातारा या संघानेही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्यातील एकाही संघाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविता आला नाही.
शनिवारी सकाळच्या सत्रात शेवटच्या साखळीच्या सामन्यात सोलापूरच्या ग्रीन स्टार स्पोर्ट्स क्लबला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळण्याची संधी मुंबईच्या प्रोनेट्स क्लबने हिरावून घेतली. चुरशीच्या सामन्यात त्यांना मुंबईकडून ४७-५२ असा पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या दहा मिनिटाच्या डावात ग्रीन स्टारने १८-४ अशी निर्णयक आघाडी घेतली होती. मध्यंतराची २७-२० ही आघाडीही त्यांना टिकविता आली नाही. अखेर ग्रीन स्टारला मुंबईकडून ४७-५२ असा पराभव स्वीकारावा लागला. ग्रीन स्टारकडून दानिश शेख १३ व मोईन सय्यद १० गुण नोंदवित लढत दिली. मुंबईकडून एस. करण याने अचूक बास्केट करीत २१ गुण नोंदवित संघाचा विजय खेचून आणला. धर्मपाल कुमावत (७ गुण) याने त्यास साथ दिली.
अन्य एका साखळी सामन्यात घाटकोपर प्रतिष्ठान मुंबईस सांगोला तालुका असोसिएशनला ४६-४० असे असे हरविताना चांगलीच दमछाक झाली. सोलापूरच्या हुपर्स संघाने सोलापूर स्पोर्टस इन्स्टिट्यूटवर २७-२५ अशी मात केली. अकलूजच्या शिवरत्न क्लबला साताराच्या एन व्ही अस ५३-४० असे नमविले.
तसेच इतर सामन्यामध्ये डेक्कन जिमखाना पुणे विजयी विरूद्ध. चॅलेंजर्स स्पोर्ट्स गुणकी ७९-५६, घाटकोपर वाय एम सी ए मुंबई विजयी विरूद्ध.डू इट कोल्हापूर ५०-१४, खारघर विजयी विरूद्ध साई स्पोर्ट्स पुणे ३२-१२, इंडियन जिमखाना मुंबई विजयी विरूद्ध विद्या प्रतिष्ठान सोलापूर ५४-१२.
त्याचप्रमाणे उपांत्यपूर्व सामने काल रात्री घाटकोपर क्रीडा प्रतिष्ठान विरुद्ध डेक्कन जिमखाना पुणे मॅनिक स्पोर्ट्स अकॅडमी विरुद्ध जय हिंद जिमखाना कडा (बीड) एनव्ही अस सातारा विरुध्द इंडियन जिमखाना घाटकोपर वायएमसीए विरुद्ध प्रोनेट्स क्लब मुंबई असे झाले.
रविवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळ सत्रात सेमी फायनल चे सामने होणार असून सायंकाळच्या सत्रात तृतीय व चतुर्थ क्रमांकाकरिताचा व अंतिम सामना असे दोन सामने होणार आहेत.
——————————-
कै. गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके ४३ वा स्मृती समारोह राज्यस्तरीय पुरुषांच्या निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज रविवार १ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता रायफल शूटिंग ऑलिंपिक पद विजेते स्वप्निल कुसाळे यांच्या शुभहस्ते प्रांताधिकारी मंगळवेढा बी.आर.माळी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी मंगळवेढा विक्रांत गायकवाड, तहसीलदार सांगोला संतोष कणसे, पोलीस निरीक्षक सांगोला भिमराव खणदाळे यांच्या सन्माननीय उपस्थितीत तर उद्योगपती सिद्धार्थ झपके,विलास क्षीरसागर,सुहास होनराव,ज्ञानेश्वर तेली,नागेश तेली,मंगेश म्हमाणे रत्नाकर ठोंबरे (पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. अशी माहिती सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी दिली आहे
———————————–
याशिवाय विशेष बाब वयाची पन्नाशी ओलांडलेल्या बास्केटबॉल खेळाडूंसाठीचा या मैदानावर खेळण्याची विशेष आवड म्हणून विशेष सामना सांगली मास्टर्स विरुद्ध सोलापूर मास्टर्स या दोन संघात सायंकाळी झाला..