सोनंद (ता. सांगोला) गावचे सुपुत्र तेजसिंग रमेश साळुंखे हा जवान गुवाहाटी (आसाम) कर्तव्यावर असताना रविवारी पहाटे चारच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर सोनंद गावामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.पियुष साळुंखे-पाटील, युवा नेते सागर पाटील यांच्यासह सोनंद गावातील ग्रामस्थ, माजी सैनिक तसेच तिबत बटालियन पोलीस बेळगावचे कॅप्टन कोमल सिंग आणि गोहाटी येथून आलेले कॅप्टन प्रवीण परमार यांच्या 11 जवानांची टीम उपस्थित होती.
अंत्यसंस्कार प्रसंगी माजी सैनिक कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन रावसाहेब साळुंखे, सहसचिव वॉरंट ऑफिसर उत्तम चौगुले, सोनंद संस्थेचे अध्यक्ष सुभेदार रामचंद्र काशीद, सुभेदार मुरलीधर ठोकळे, जवळा संघटनेचे अध्यक्ष पंडित साळुंखे आणि सर्व पदाधिकारी व जवळा, सोनंद, सांगोला परिक्षेत्रातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी सोनंद गाव बंद ठेवण्यात आले होते.
तेजसिंग रमेश साळुंखे हा तरुण सन २००८ साली इंडो तिबेटयन बॉर्डर पोलीस फोर्स (सेक्टर – १०) मध्ये भरती झाला होता. बेळगाव येथे प्रशिक्षण झाल्यानंतर सन २००९ साली लेहलडाख (जम्मू काश्मीर) येथे कर्तव्यावर हजर झाला होता. गेली १५ वर्षे भारतीय सीमेवर कर्तव्य बजावल्यानंतर त्याचे प्रमोशन झाले होते. दरम्यान जालंदर (पंजाब) येथून गुवाहाटी (आसाम) येथे बदली झाली होती. तेथे कर्तव्यावर हजर होऊन परत सोनंद (ता. सांगोला) गावी सुट्टीवर आला होता. गेल्या १५ दिवसांपूर्वी पुन्हा तो कर्तव्यावर हजर झाला होता. दरम्यान रविवारी पहाटे ४ च्या सुमारास कर्तव्यावर असताना त्यास हृदयविकाऱ्याच्या धक्क्याने वीरमरण आले.