एस. टी. कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्याकरिता आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वसामान्य प्रवाशांची जरी गैरसोय होत असली तरी देखील अहोरात्र कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या देखील तितक्याच महत्त्वाच्या व संवेदनशील आहेत. अवघ्या महाराष्ट्राची जीवन वाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रचंड व्यथा, वेदना आणि विवंचना आज ही तितक्याच गंभीर आहेत.
प्रचंड वाढलेल्या महागाईच्या या काळात अत्यंत तुटपुंज्या वेतनावर एसटी कर्मचारी अहोरात्र मेहनत करून सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकारक करीत आहेत. परंतु याच कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा प्रवास मात्र खडतर बनला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग मिळावा ही या कर्मचाऱ्यांची रास्त मागणी असताना देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या कर्मचाऱ्यांच्या मागण्याला बेदखल करण्यात येत आहे. सातत्याने एसटी महामंडळ तोट्यात आहे असे महामंडळाकडून भासवून शासनास खोटी माहिती पुरवली जात आहे. सातवा वेतन आयोग या कर्मचाऱ्यांना दिल्यास महामंडळाचे फार मोठे नुकसान होणार नाही. अनेक योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात निधी अलीकडील काळामध्ये वितरित करीत आहे. महिला सन्मान योजना, अमृत योजना, अपंग योजना, विद्यार्थिनी मोफत पास योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शासन दरवर्षी सुमारे 4000 कोटी इतका निधी महामंडळाकडे देत आहे. त्यामुळे अलीकडील काळामध्ये एसटी महामंडळ हे तोट्यात नसून नफ्यात आलेले आहे. अशा प्रसंगी ज्या कर्मचाऱ्यांच्या घामावर व कष्टावर या महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीची चाक फिरते आहे. त्या कर्मचाऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळाला पाहिजे. याकरिता या कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाची मागणी मंजूर व्हावी. म्हणून आज पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
अशा या एसटी महामंडळाच्या कष्टकऱ्यांच्या पाठीमागे मी ठामपणे व खंबीरपणे उभा राहणार असून त्यांच्यासोबत या लढ्यामध्ये या कष्टकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत खांद्याला खांदा लावून सहभागी होईल. प्रसंगी चक्काजाम करण्याची वेळ आली तरी मी मागे हटणार नाही. असे मा. आम. दीपक आबा साळुंखे पाटील यांनी स्पष्ट करत एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.